माजी कुलगुरू सुधीर मेश्राम यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:08 AM2021-03-16T04:08:29+5:302021-03-16T04:08:29+5:30
नागपूर : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम (६६) यांचे सोमवारी निधन ...
नागपूर : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम (६६) यांचे सोमवारी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी जोत्स्ना व मुलगा सिद्धार्थ हे आहेत. अंबाझरी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
डॉ. मेश्राम हे सूक्ष्मजीवशास्त्राचे तज्ज्ञ होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. सोबतच राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटरचेदेखील ते संस्थापक संचालक होते. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले होते. तसेच त्यांच्या नावे काही पेटंटदेखील होते.
अमरावती येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मायक्रो-बायोलॉजीत एम.एस्सी. आणि नंतर पीएच.डी. पूर्ण केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. योजना आयोगाच्या सुकाणू समितीचे सल्लागार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. विशेषत: प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान व शोध शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचा "लॅब टू लॅण्ड' प्रकल्प त्यांनी राबवला. एनसीसीचे ते मानद कर्नल कमांडन्टदेखील होते. याशिवाय राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध समित्या व संस्थांचे सदस्य म्हणूनदेखील ते कार्यरत होते.