फडणवीसांच्या भाग्यात 'माजी' शब्द अल्पायू : भैयाजी जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 09:36 PM2020-02-21T21:36:17+5:302020-02-21T21:37:45+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री हा शब्द अल्पायू असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री हा शब्द अल्पायू असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान असलेले जोशी यांचे वक्तव्य काही वेगळे संकेत देणारे तर नाही ना, अशी शंका उपस्थित झाली आहे.
साधना सहकारी बँकेच्या जरीपटका येथील २२ हजार चौरस फूट जागेतील नवनिर्मित भवनाचे लोकार्पण भैयाजी जोशी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरिता फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बँकेचे अध्यक्ष घनश्याम कुकरेजा, मनपा आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, बँकेचे माजी अध्यक्ष आवतराम चावला, उपाध्यक्ष अॅड. विनोद लालवानी, बँकेचे पदाधिकारी व संचालक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्व. अर्जुनदास कुकरेजा आणि स्व. माजी आ. गंगाधरराव फडणवीस यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण भैयाजी जोशी आणि सरिता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
जोशी म्हणाले, लोकशाही देशाची मोठी शक्ती आहे. मताचा अधिकार सर्वोच्च आहे. लोकशाहीची ताकद लोकांमध्ये आहे. संविधानाने अधिकार मिळाले, पण अधिकार काय आहेत हे अधोरेखित झाले नाही. ७० वर्षांत कर्तव्याची जागृती आली नाही. केवळ कर्तव्याचा भाव आहे. बँकेच्या संदर्भात ते म्हणाले, सहकारितेचा भाव सक्षम राहिला पाहिजे. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास विकास होईलच. बँकेला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजेच पाया मजबूत आहे. इमारत चार मजली असल्याने चारपट विकास होणार आहे. अर्थ क्षेत्रात काम करणे तसे कठीण आहे. फळाची आशा जिथे असते, तिथे साधना नसते. बँकेचा ग्राहक महत्त्वपूर्ण आहे. अर्थसोबत खेळणारे लोक नि:स्वार्थ असल्यास तिथे परमार्थ होतो. संकल्प घेऊन बँकेचे काम सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
वारिस पठाणवर सरकारने कारवाई करावी : जोशी
वारिस पठाणच्या वक्तव्याचा निषेध करताना भैयाजी जोशी म्हणाले, हिंदुस्थान सहिष्णू देश आहे. मुस्लीम देशात असे बोलले असते तर खपवून घेतले असते काय? वारिस पठाणवर सरकारने कठोर कारवाई करावी.
वारिस पठाण यांचे वक्तव्य निंदनीय : देवेंद्र फडणवीस
देशात १०० कोटी हिंदू आहेत. म्हणूनच त्यांना येथे बोलण्याचा अधिकार आहे. एखाद्या मुस्लीम देशात असे बोलले असते तर काय अवस्था झाली असती? या देशातील हिंदू सहिष्णू आहे. याचा अर्थ कमजोर आहेत असा नाही. वारिस पठाण यांचे वक्तव्य निंदनीय आहे. त्यांनी माफी मागावी, अन्यथा सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
फडणवीस म्हणाले, सर्वांनी मिळून बँक सुरू केली तेव्हा व्यापार नव्हे तर समाजसेवा ही भावना होती. बँकेने समाजाला पुढे नेले आहे. समाजाच्या प्रगतीत छोट्या बँकांचे मोठे योगदान आहे. ही बँक विश्वासाने प्रगती करीत आहे. अर्जुनदास आणि गंगाधरराव हे दोघे मित्र होते. त्यांचे काम हेच स्मारक आहे. बँक भविष्यात प्रगती करेल, असा विश्वास आहे.
सरिता फडणवीस म्हणाल्या, अर्जुनदास आणि गंगाधरराव यांच्यातील मैत्रीनेच बँकेचे अवघड स्वप्न साकार झाले. हा वेल असाच फुलत राहो. सभासद आणि ग्राहकांच्या योगदानाने बँकेची प्रगती होईल. घनश्याम कुकरेजा यांनी बँकेच्या स्थापनेपासून आजतागायत झालेल्या प्रगतीची माहिती दिली. ते म्हणाले, संचालक आणि ग्राहकांच्या सहकार्याने बँक मोठी झाली आहे.
याप्रसंगी भवनाच्या निर्मितीत हातभार लागलेल्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.