विदर्भातील पुरातत्त्व विभागाचे आरक्षित गड-किल्ले, झुडपे अन् वेलींच्या हवाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:04 PM2019-11-02T12:04:13+5:302019-11-02T12:07:35+5:30
विदर्भातील गड-कोट- किल्ल्यांच्याही संरक्षण, संवर्धनाबाबत दुजाभाव केला जात असल्याचे उघडउघड दिसून येते.
प्रवीण खापरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्या वारसाची साक्ष देत अवघा महाराष्ट्रभर गड-कोट-किल्ले अन् दुर्ग दिमाखाने उभे आहेत. त्यांचे संरक्षण, संवर्धनवगैरे केले जात असल्याच्या गोष्टी सांस्कृतिक मंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि भारतीय व महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाकडून सांगितलेही जाते. मात्र, विकासाबाबत ज्याप्रमाणे विदर्भाशी अनेक वर्षे दुजाभाव केला गेला, त्याचप्रमाणे विदर्भातील गड-कोट- किल्ल्यांच्याही संरक्षण, संवर्धनाबाबत दुजाभाव केला जात असल्याचे उघडउघड दिसून येते. राज्याच्या अगदी टोकाला असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा गडचिरोली येथील वैरागड येथे असलेल्या बाबा बल्लाळशाह यांनी बांधलेल्या किल्ल्याची दुरवस्था बघून, हा दुजाभाव स्पष्टपणे जाणवतो.
वैरागडचा हा किल्ला नागपूरपासून साधारणत: १५० किमी अंतरावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात येतो. आरमोरीपासून १६ किमी अंतरावर वैरागड येथे हा किल्ला अतिशय जीर्ण अवस्थेत पंधराव्या शतकातील दूरदृष्टीची आणि त्या काळातील वास्तुकलेची साक्ष देतो. सध्या हा किल्ला पूर्णत: झुडपे आणि वेलींच्या आडोशाखाली गेला असून, किल्ल्याचे बुरुज, भिंती ढासळल्या आहेत. किल्ल्यात गुरे-ढोरे- शेळ्या दररोज चरण्यासाठी आलेल्या असतात. किल्ल्याच्या कधी काळी डागडुजी केलेल्या प्रवेशद्वारावर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचा फलक दिमाखाने उभा असलेला दिसून येतो.
या फलकावर हा किल्ला संरक्षित असल्याचे सांगण्यासोबतच अवैध बांधकाम, वास्तूशी छेडखानी आदी केल्यावर शिक्षा आणि दंड अशा सूचनाही लिहिलेल्या आहेत. असे असतानाही किल्ल्याच्या संरक्षणासाठीची करावयाची तरतूद इथे दिसून येत नाही. तो काळ मोघलांच्या आक्रमणाचा असून, शत्रूंना सहज प्रवेश करता येऊ नये, या अनुषंगाने १५ ते २० फूट खोल असे खंदक खोदण्यात आले होते. हे खंदक आजही वर्षभर पाण्याने भरून राहते. आतमध्ये अनेक बुरुज, विहिरी आहेत. येथेही पाणी तुडुंब भरलेले दिसून येते. मात्र, यांची दुरवस्था पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य कार्यप्रणालीची साक्ष देते. एकूणच इतिहासाचा हा वारसा शासकीय कार्यप्रणालीपुढे हतबल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येतो. अशीच स्थिती तुमसरजवळील अंबागड, नरखेडजवळील आमनेर, सानगडीचा डोंगरी किल्ला आदींची स्थिती आहे.
२०१४ मध्ये झाले होते डागडुजीचे काम
परिसरातील नागरिक, इतिहासप्रेमींच्या मागणीवरून २०१४ मध्ये किल्ल्याच्या सौंदर्यीकरणास सुरुवात झाली होती. मात्र, किल्ल्याचे प्रवेशद्वाराची डागडुजी वगळता या किल्ल्यात कुठलेही सौंदर्यीकरण झाले नसल्याचे दिसून येते. उलट, संपूर्ण किल्ला झुडपांच्या आणि वेलींच्या आडोशाखाली गेला आहे. अपुऱ्या निधीची ओरड करून, हा किल्ला पुन्हा निसर्गाच्या कवेत गेल्याचे स्पष्ट होते.
हिऱ्याच्या खाणीसाठी बांधला हा किल्ला
वैरागडला पौराणिक आधार आहे. द्वापर युगात वैराकन राजाने हे गाव वसवल्याचे दाखले आहेत. कालांतराने हा भाग गोंड साम्राज्यात आला. येथे हिऱ्याची खाण असल्याने खाणीच्या संरक्षणार्थ चंद्रपूरचा गोंडराजा बाबाजी बल्लाळशाह यांनी हा किल्ला १५ व्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. अबुल फजल याने लिहिलेल्या ‘आईने अकबरी’ या वृत्तांकन तपशिलात या किल्ल्याचा उल्लेख आहे. हिऱ्याच्या खाणीची लूट करण्यासाठी मोघलांच्या स्वाऱ्या त्या काळात होत असत. खाण बंद पडल्याने नंतर हा किल्ला बल्लाळशाहने सोडल्यानंतरपासून किल्ल्याच्या अधोगतीस सुरुवात झाली. १९२५ साली इंग्रजांच्या काळात या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते.
ऐतिहासिक तारखांचे सोहळे झाल्यास, किल्ल्यांचे संवर्धन - प्रफुल्ल माटेगावकर
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले असल्याने, महाराजांच्या प्रेमापोटी गड-कोट-किल्ले-दुर्ग यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती आहे. मात्र, विदर्भात तसे होताना दिसत नाही. त्यासाठी विदर्भातील किल्ल्यांसाठी गोंड राजे, भोसले राजे यांच्या महत्त्वाच्या दिवसांचे सोहळे साजरे व्हायला लागले तर येथील किल्ल्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होऊ शकते. सध्या किल्ले संवर्धन समितीकडे ८१ किल्ले आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने म्हटल्यास, वैरागडचा किल्लाही आम्ही संवर्धित करू, अशी माहिती किल्ले संवर्धन समितीचे सदस्य प्रफुल्ल माटेगावकर यांनी दिली.