फुटाळा परिसरात दिवसभर पार्किंग नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:32 AM2018-06-10T01:32:11+5:302018-06-10T01:32:20+5:30
महापालिकेतर्फे फुटाळा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवारी श्रमदान करण्यात आले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलाव स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. तलावालगतच्या जागेत फक्त दिवसातून तीन तास पार्किंग करण्यात येईल, अशी सोय करण्यात यावी. दिवसभरासाठी वाहनांना पार्किंगसाठी बंदी घालण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे फुटाळा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवारी श्रमदान करण्यात आले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलाव स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. तलावालगतच्या जागेत फक्त दिवसातून तीन तास पार्किंग करण्यात येईल, अशी सोय करण्यात यावी. दिवसभरासाठी वाहनांना पार्किंगसाठी बंदी घालण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.
या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर उपस्थित होते. फुटाळा तलावातील जलपर्णी काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेला आहे. गाळ योग्य त्या जागी साठविण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. तलावालगत असलेले अतिक्रमण त्वारित हटविण्याचे आदेश आयुक्तांनी देताच परिसरातील अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात आले. तलाव परिसरातील दुकांनानी आपली हद्द सोडून अवैधरीत्या शेड टाकले आहे. त्यावर आयुक्तांनी सर्व दुकानांना नोटीस देऊन ते शेड काढून टाकण्यात यावे, असे निर्देश दिले. मंजूर नकाशानुसार जर बांधकाम नसेल तर तेही काढून टाकण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. परिसरात मंदिराचा काही भाग वाढविण्यात आलेला आहे. याबाबत नासुप्रला पत्र पाठविण्यात यावे. मंदिराचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे आहे की नाही, याची खातरजमा करावी, त्याचा अहवाल मला सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
१०० मीटर अंतरावर कचरापेट्या ठेवा
फुटाळा तलावाच्या परिसरात प्रत्येक १०० मीटर अंतरावर कचरापेटी ठेवण्यात यावी, जेणेकरून नागरिक कचरा त्या कचरापेटीतच टाकतील. तलाव व परिसरात घाण करू नये असे सूचना फलक लावण्यात यावे, अशा सूचनादेखील आयुक्त सिंह यांनी केल्या. परिसरात पाळीव प्राणी आणण्यासाठी मज्जाव करण्यात यावा. परिसरात येणाऱ्या गाई-म्हशीचा बंदोबस्त करण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.