नागपुरात साडेचार लाख नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:13 PM2019-06-28T21:13:06+5:302019-06-28T21:15:59+5:30
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखांहून नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखांहून नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. नागपुरात १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१९ या कालावधीत किती जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांना किती दंड ठोठावण्यात आला, परवाना नसताना किती लोक वाहन चालवत होते, तसेच किती हेल्मेट न घालता सापडले, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर किती कारवाई झाली इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१८ ते २० मे २०१९ या कालावधीत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ४ लाख ५२ हजार ३८ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून १० कोटी ७० लाख १३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
१७ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात ३२५ अपघात झाले व यात ३४९ नागरिकांचा बळी गेला. तर आऊटर रिंग रोडवर १७५ अपघातांमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला.
सर्व वाहनचालकांमध्ये त्रुटी कशा ?
माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ४ लाख ५२ हजार ३८ वाहनांची तपासणी केली. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व वाहनचालकांवर कारवाई झाली. तपासणी झालेल्या सर्व वाहनचालकांमध्ये त्रुटी कशा काय आढळून आल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुन्हा कारवाई दंड (रुपयांमध्ये)
हेल्मेट न घालणे ७४,०७४ २,८६,०९,४००
परवाना नसणे १६,६५५ ८१,८९,५००
मोबाईलवर बोलणे १५,१२० २३,७४,०००
दारु पिऊन वाहन चालविणे २५,४५५ २,५५,१२,८००
वाहतूक सिग्नल तोडणे ३४,८९४ ५७,३२,७००
हेल्मेट न घालणे ७४ हजार जणांना भोवले
हेल्मेट न घालता दुचाकी चालविण्याप्रकरणी ७४ हजार ७४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ८६ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या १५ हजार १२० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांना २३ लाख ७४ हजारांचा दंड ठोठाविण्यात आला. वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील गाडी चालवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ हजार ६५५ महाभागांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ८१ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तळीरामांकडून अडीच कोटी वसूल
मद्यप्राशन करून वाहने चालविताना २५ हजार ४५५ वाहनचालक वाहतूक विभागाच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ५५ लाख १२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर वाहतूक सिग्नल तोडणाऱ्या ३४ हजार ८९४ नागरिकांवर कारवाई केली व त्यांच्याकडून ५७ लाख ३२ हजार ७०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.