एचव्हीडीएस अंतर्गत कृषिपंपाच्या साडेचार हजार वीजजोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:49+5:302021-07-10T04:07:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणने उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) नागपूर परिमंडळातील नागपूर व वर्धा येथे कृषिपंपाच्या साडेचार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणने उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) नागपूर परिमंडळातील नागपूर व वर्धा येथे कृषिपंपाच्या साडेचार हजार वीज जोडण्याचे काम पूर्ण केले आहे. नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ८५ टक्के अर्जदारांना वीज जोडणी देण्यात आली आहे.
नागपूर ग्रामीण भागात २,७०५, नागपूर शहरात १०२ तर वर्धा जिल्ह्यात १,७२२ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात या वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणकडून शेतकऱ्यांच्या शेतात ४ हजार ५३० रोहित्रांची उभारणी करण्यात आली आहे. उच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत वीज जोडणी मिळावी यासाठी वर्धा जिल्ह्यातून १,८१४ ,नागपूर ग्रामीण भागातून ३२३९ आणि नागपूर शहरातून १३८ शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केला आहे.
राज्यात ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या २ लाख २४ हजार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडणीसाठी राज्य शासनाने उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरू केली. त्याप्रमाणे स्वतंत्र रोहित्राद्वारे प्रत्येकी एक किंवा जास्तीत जास्त दोन कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात येत आहेत. या योजनेसाठी राज्य शासनाने ५ हजार ४८ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात २ हजार २४८ कोटी ९ लाखांचा निधी राज्य शासनाकडून विदर्भ व मराठवाड्याकरिता अनुदान स्वरूपात मिळणार असून उर्वरित महाराष्ट्राकरिता २ हजार ७९९ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी महावितरण वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात घेणार आहे. दि. ३१ मार्च २०१८ नंतर उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरू होईपर्यंत विविध योजनामार्फत कृषिपंपांच्या वीज जोडण्या देण्यात आल्याने उर्वरित पैसे भरून प्रलंबित असलेल्या १ लाख ५८ हजार २६ नवीन वीज जोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी १८५ नवीन उपकेंद्रांसह उच्चदाब वीजवाहिन्या, वितरण रोहित्र आदी यंत्रणेचे जाळे उभारण्यात येत आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या योजनेचा नुकताच आढावा घेतला.