नागपूर महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण करणारे चार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:23 AM2018-09-30T01:23:44+5:302018-09-30T01:24:54+5:30
हुडकेश्वरमधील शारदा चौकात गणेश विसर्जनाच्या वेळी महापालिका कर्मचारी नीलेश हाथीबेड (वय ३४, रा. ठक्करग्राम, पाचपावली) याला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी विक्की ठाकूर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वरमधील शारदा चौकात गणेश विसर्जनाच्या वेळी महापालिका कर्मचारी नीलेश हाथीबेड (वय ३४, रा. ठक्करग्राम, पाचपावली) याला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी विक्की ठाकूर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गणेश विसर्जनासाठी जागोजागी कृत्रिम टँक बनविण्यात आले होते. त्यातील माती काढून नेण्यासाठी महापालिकेने वाहन ठेवले होते. अशाच एका वाहनावर चालक म्हणून कार्यरत असलेला नीलेश शारदा चौकातील टँकजवळ बसून होता. हनुमाननगर झोनच्या सभापती आणि नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा दीर विक्की ठाकूर तेथे आला. त्याने नीलेशला तातडीने तेथून वाहन काढण्यास सांगितले. थोडा विलंब झाल्याने संतप्त झालेल्या विक्की आणि त्याच्या साथीदारांनी नीलेशला बेदम मारहाण करून जबर जखमी केले. दोष नसताना नीलेशला मारहाण करणाºया विक्की तसेच त्याच्या साथीदारांची गुंडगिरी अनेकांनी बघितली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला. महापालिका कर्मचाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी या घटनेचा निषेध करून गुंडगिरी करणाऱ्या विक्की आणि साथीदारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, नीलेशच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी जुजबी कलमा लावून प्रकरण निस्तरण्याचे प्रयत्न केले. शारदा चौकातील एका सीसीटीव्हीमध्येही ही गुंडगिरी कैद झाली. मात्र, कर्मचाºयांनी हे प्रकरण लावून धरले. त्यामुळे पोलिसांनी कारवाईसाठी धावपळ चालवली. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी तिघांना तर शनिवारी एकाला अशा प्रकारे चौघांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी विक्कीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नाही.
कुठे लपला विक्की ?
आरोपी विक्की ठाकूर कुख्यात आहे. वहिनी नगरसेविका असली तरी तोच नगरसेवक असल्याच्या आविर्भावात वागतो. कर्मचाºयांनाच नव्हे तर मदत मागण्यासाठी आलेल्या गरीब नागरिकांनाही तो तोंड टाकून बोलतो. त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन करतो. राजकीय पांघरुण असल्याने काही पोलीसही त्याच्या संपर्कात आहेत. तेच त्याला अटकेच्या कारवाईपासून दूर ठेवत असल्याची चर्चा आहे.