आठ तासात चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:06+5:302020-12-07T04:07:06+5:30
सावनेर : शहरातील माताखेडी मंदिर परिसरातील घरफाेडी प्रकरणात सावनेर पाेलिसांनी घटनेच्या आठ तासात तीन चाेरट्यांना ताब्यात घेत अटक केली. ...
सावनेर : शहरातील माताखेडी मंदिर परिसरातील घरफाेडी प्रकरणात सावनेर पाेलिसांनी घटनेच्या आठ तासात तीन चाेरट्यांना ताब्यात घेत अटक केली. यात चाेरट्यांनी साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण २ लाख ४६ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला हाेता.
रहेमान खान (२२), निजाम शेख (२१) व नीतेश जुनघरे (२१) तिघेही रा. सावनेर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. संगीता कचरू छत्रे (४०, रा. सटवा माता मंदिर परिसर, माताखेडी, सावनेर) या त्यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने ३० नाेव्हेंबर राेजी कुटुंबीयांसह हिंगणा येथे गेल्या हाेत्या. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. नेमकी हीच संधी साधून चाेरट्याने दाराचे कुलूप व कडी ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्यांनी कपाटातील २ लाख २६ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये राेख असा एकूण २ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला.
घरी परत आल्यावर चाेरी झाल्याचे लक्षात येताच संगीता छत्रे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या चाेरीत रहेमान खान याचा सहभाग असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याला त्याच्या सावनेर येथील घरून ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यामुळे पाेलिसांनी अन्य दाेघांनाही अटक केली. ही कारवाई ठाणेदार अशाेक काळी यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.