रेल्वेत दागिने चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांना अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:38+5:302021-07-14T04:09:38+5:30
नागपूर : रेल्वेत प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून २ जुलैला दिल्लीत अटक ...
नागपूर : रेल्वेत प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून २ जुलैला दिल्लीत अटक केली. आरोपींची पोलीस कोठडी मिळवून चौकशीत पोलिसांनी या टोळीकडून १० लाख १६ हजार रुपये किमतीचे २७० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७० ग्रॅम चांदी जप्त केली आहे.
रविसिंग ऊर्फ तिल्ली लुभाना (२७), विनोद ऊर्फ काले सैनी (४२), सोनू गर्ग (२५) आणि पवन वर्मा (५०) सर्व रा. त्रिलोकपुरी दिल्ली, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांचे दागिने चोरी करून ते वितळविले. वितळविलेले दागिने विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी चारही आरोपींना रंगेहाथ अटक केली. दिल्लीतील या टोळीचे सदस्य जानेवारी २०२१ मध्ये नागपुरात आले होते. त्यांनी रेकी करून ११ जानेवारीला नवजीवन एक्स्प्रेसमधून, २५ मार्चला सेवाग्राम एक्स्प्रेसमधून, १४ जूनला नवजीवन एक्स्प्रेसमधून सहा बॅग चोरी केल्या. त्यानंतर जोधपूर-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये चोरी केली. या टोळीतील पवन वर्मा हा सराफा व्यापारी आहे. चोरी केलेले दागिने वितळवून तो शुद्ध सोने काढतो. हे सोने तो मिर्झापूर, उत्तर प्रदेश येथे नातेवाईक असलेल्या सराफांना विकतो. सोनू हा रिक्षाचालक असून विनोद बिछायत केंद्र चालवतो. रवी आणि पवनची पत्नी टोळीचे सूत्रधार आहेत. पवनची पत्नी सध्या फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षेत्रात चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली. दरम्यान, एका प्रवाशाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यांना आरोपी चंद्रपूर येथील लॉजवर थांबत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी चंद्रपुरातील लॉजची तपासणी केली असता, संशयित आरोपींचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावरून आरोपीचा पत्ता शोधला आणि दिल्लीत जाऊन आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
.................