शहर बससाठी ३४ एकर जागेत चार डेपो
By admin | Published: October 20, 2016 03:03 AM2016-10-20T03:03:32+5:302016-10-20T03:03:32+5:30
नागपूर शहरातील प्रवाशांना चांगल्या दर्जाची बससेवा मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत.
मनपा जागा देणार : नवीन आॅपरेटरची नियुक्ती
नागपूर : नागपूर शहरातील प्रवाशांना चांगल्या दर्जाची बससेवा मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत. यात नवीन आॅपरेटरच्या नियुक्तीसोबतच बस डेपोसाठी शहरातील चार ठिकाणी ३४ एकर जागा उपलब्ध करण्याला महापालिका प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. बुधवारी परिवहन समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
शहरातील बसेस उभ्या करण्यासाठी व देखभाल करण्यासाठी यशवंत स्टेडियम येथील काही जागेचा वापर केला जातो. तसेच हिंगणा नाका येथे जागा उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु ही जागा पुरेशी नाही. शहर बस संचालनासाठी नवीन चार आॅपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. ६०० बसेस उभ्या करण्यासाठी जागेची उणीव भासणार आहे.
ग्रीन बस आॅपरेटरला यापूर्वीच वाडी व खापरी नाका येथे जागा देण्यात आली आहे. लाल बसेससाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या तीन आॅपरेटला जागा उपलब्ध केली जाणार आहे.
यात भांडेवाडी येथे १६ एकर, वाठोडा येथील स्वामी नारायण मंदिराजवळ ८ एकर तर गोरेवाडा व कोराडी येथे प्रत्येकी ५ एकर जागा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती बाल्या बोरकर यांनी दिली. आॅपरेटरला जागा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार जागा उपलब्ध क रण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या जागेचा मोबदला म्हणून महापालिका संबंधित आॅपरेटरकडून या जागेचे भाडे वसूल करणार आहे. (प्रतिनिधी)
१५ नोव्हेंंबरपर्यंत ५५ ग्रीन बस
१५ नोव्हेंबरपर्यत शहरात ५५ ग्रीन बसेस चालविण्याचे उद्दिष्ट महापालिकेच्या परिवहन समितीने ठेवले आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सर्व प्रकारची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रीन बस लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहे.