राज्यात कोरोनाच्या वाढीत विदर्भातील चार जिल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:18+5:302021-02-06T04:16:18+5:30
नागपूर : राज्यात कोरोनाबाधितांच्या साप्ताहिक रुग्णवाढीत पहिल्या पाच जिल्ह्यांत विदर्भातील चार जिल्हे आहेत. यात अमरावती, यवतमाळ, अकोला व वर्धा ...
नागपूर : राज्यात कोरोनाबाधितांच्या साप्ताहिक रुग्णवाढीत पहिल्या पाच जिल्ह्यांत विदर्भातील चार जिल्हे आहेत. यात अमरावती, यवतमाळ, अकोला व वर्धा जिल्हा आहे. साप्ताहिक मृत्यूदर वाढीत भंडारा, गडचिरोली जिल्हा, तर सर्वाधिक पॉझिटिव्हिटीमध्ये अमरावती व नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. विदर्भात कोरोनाचा धोका टळला नसल्याचे यावरून दिसून येते.
सार्वजनिक आरोग्य विभागाने ४ फेब्रुवारीपर्यंतची राज्यातील कोरोनाची स्थिती स्पष्ट केली. यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आरोग्य विभागाने जिल्हा पातळीवरील इंडिकेटर्स दिले आहेत. यात मागील सात दिवसांमध्ये अमरावतीमध्ये ३.१५ टक्के, यवतमाळमध्ये २.८ टक्के, अकोल्यामध्ये २.२४ टक्के, नंदूरबारमध्ये २.२१ टक्के, तर वर्धामध्ये २.१६ टक्के रुग्णांत वाढ झाली आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही सर्वाधिक वाढ आहे.
-मृत्युदरात भंडारा दुसऱ्या स्थानी
साप्ताहिक मृत्युदरात पहिल्या पाच जिल्ह्यांत पहिल्या स्थानी रत्नागिरी जिल्हा आहे. येथे १३.६४ टक्के मृत्युदर आहे. दुसऱ्या स्थानी भंडारा जिल्हा असून, येथे ७.६९ टक्के, तिसऱ्या स्थानी गडचिरोली जिल्हा असून, येथे ७.३२ टक्के, चौथ्या स्थानी नांदेड जिल्हा असून, येथे ३.८९ टक्के, तर पाचव्या स्थानी नंदुरबार जिल्हा असून, येथे ३.८१ टक्के मृत्युदर आढळून आला आहे.
-पॉझिटिव्हिटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा
राज्यात मागील आठवड्यात पॉझिटिव्हिटीमध्ये पहिल्या पाच जिल्ह्यांत अमरावती जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. येथे ८.९१ टक्के पॉझिटिव्हिटी दिसून आली. पहिल्या स्थानी नंदूरबार जिल्हा असून, येथे १०.६८ टक्के, दुसऱ्या स्थानी सातारा जिल्हा असून, येथे ९.२१ टक्के, चौथ्या स्थानी नागपूर असून, येथे ८.४३ टक्के, तर पाचव्या स्थानी नाशिक जिल्हा असून, येथे ७.५८ टक्के पॉझिटिव्हिटी आढळून आली.