कन्हान नदीत चाैघांचा बुडून मृत्यू : वाकी परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 11:28 PM2021-06-22T23:28:30+5:302021-06-22T23:29:07+5:30
Four drowns in Kanhan river, crime news फिरायला आलेल्या नागपूर शहरातील आठ जणांपैकी चाैघे पाेहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना पाण्याचा अंदाज न आल्याने चाैघेही डाेहात गेले आणि बुडाले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा (नागपूर) : फिरायला आलेल्या नागपूर शहरातील आठ जणांपैकी चाैघे पाेहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना पाण्याचा अंदाज न आल्याने चाैघेही डाेहात गेले आणि बुडाले. यातील एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पाेलिसांना यश आले ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकी शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात मंगळवारी (दि. २२) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
बुडालेल्या तरुणांमध्ये ताेफिक आशिफ खान (१६, रा. शांतीनगर, नागपूर), प्रवीण गलाेरकर (१७, रा. जयभीम चाैक, यादव नगर, नागपूर), अतेश शेख नासिर शेख (१७, व्हीएचबी काॅलनी, नागपूर) व आरीफ अकबर पटेल (१६, रा. जयभीम चाैक, यादव नगर, नागपूर) या चाैघांचा समावेश असून, यातील अतेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पाेलिसांना यश आले आहे.
या चाैघांसह तेजू प्रदीप पाेटपसे (२०, रा. पाचपावली, नागपूर), शायान रियाज काजी (१८, व्हीएचबी काॅलनी, नागपूर), पलाश जितेश जाेशी (२०, रा. तीन्नल चाैक, नागपूर) व विशाल भाईलाल चव्हाण (२५, रा. इंदिरामाता नगर, नागपूर) मंगळवारी दुपारी वाकी (ता. सावनेर) परिसरात फिरायला आले हाेते. वाका येथील ताजुद्दीन बाबाच्या दर्गात दर्शन घेतल्यानंतर सर्व जण लगतच्या कन्हान नदीच्या काठावर फिरायला गेले. त्यातच ताेफिक, प्रवीण, अतेश व आरिफ पाेहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरले तर तेजू, शायान, पलाश व विशाल काठावर बसून हाेते.
काही वेळात चाैघेही पात्रात डाेहाच्या दिशेने गेले आणि खाेल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. पाण्याबाहेर पडणे शक्य न झाल्याने चाैघेही बुडाले. माहिती मिळताच खापा पाेलिसांसह एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दखल झाले. त्यांनी सायंकाळी ४.०५ वाजताच्या सुमारास आरिफचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. इतरांचा शाेध घेणे सुरू हाेते.