प्रेमीजोड्यासह चौघांनी लावला गळफास
By admin | Published: June 14, 2016 02:26 AM2016-06-14T02:26:02+5:302016-06-14T02:26:02+5:30
शहरात रविवारी एका प्रेमीजोड्यासह चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. यातील पहिली
नागपूर : शहरात रविवारी एका प्रेमीजोड्यासह चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. यातील पहिली घटना धंतोलीच्या दंतेश्वरी झोपडपट्टी परिसरातील आहे. येथे राहणारे शरद सतीश गेडाम (२५) आणि त्याची प्रेमिका बरखा सुभाष सिरसाट (१९) यांचा समावेश आहे.
शरद हा प्रतापनगर येथील एका कंपनीत काम करायचा. त्याची पत्नी बरखा हिने एअर होस्टेसचा कोर्स केला होता. दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह करून सोबत राहणे सुरू केले. मात्र त्यांच्या विवाहाला घरच्यांची परवानगी नव्हती. रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घरातील छपराच्या अँगलला दुपट्टा बांधून दोघांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. शरदच्या कुटुंबीयांनी दोघांना खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दुसरी घटना सुगतनगर येथील आहे. इंदोरा शाळेजवळ प्लॉट क्र. ४४ मध्ये राहणाऱ्या ज्योती राका चव्हाण (२७) हिने दुपारी १.३० च्या सुमारास गळफास लावला. तिची भावजय धनवती अरविंद चव्हाण यांना सूचना मिळाल्यानंतर त्या ज्योतीच्या घरी गेल्या तेव्हा ती किचनमध्ये छताला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. तिसरी घटना अजनीच्या एम्प्रेस मिल कॉलनीची आहे. येथील प्लॉट क्र. २४ चे निवासी नवीन चंद्रकांत तमाके याने रात्री ८ च्या सुमारास पंख्याला दुपट्टा बांधून आत्महत्या केली. (प्रतिनिधी)