लुटमारीच्या तयारीतील चार गुंड जेरबंद
By admin | Published: June 26, 2017 02:00 AM2017-06-26T02:00:32+5:302017-06-26T02:00:32+5:30
लुटमार करण्याच्या तयारीतील चार आरोपींना यशोधरानगर पोलिसांनी जेरबंद केले.
शस्त्र जप्त, एक फरार :
यशोधरानगर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लुटमार करण्याच्या तयारीतील चार आरोपींना यशोधरानगर पोलिसांनी जेरबंद केले. शेख सलीम शेख शब्बीर (२९, रा. मच्छीपूल, जुनी कामठी), आफीक हुसेन ख्वाजा गुलाम अब्बास हुसेन (२८, रा. हमीदनगर), मोहम्मद रसूल मोहम्मद रमजान अन्सारी (४०, रा. हमीदनगर) आणि मनोज मधुकर भैसारे (२७, रा. जुनी कामठी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचा पाचवा साथीदार रशीद शहा खान (३०, रा. अकोला ) अंधाराचा फायदा घेत मोटारसायकलने घटनास्थळाहून फरार झाला.
बीट मार्शल सुरेश बेले व शरद मुंडे शुक्रवारी रात्री गस्त करीत असताना त्यांना काही इसम कामठी रोडवर भिलगाव परिसरातील गंगवाणी कॉम्प्लेक्सच्या मागे संशयास्पदरीत्या लपून बसले आहेत,अशी माहिती मिळाली.
त्यावरून त्यांनी यशोधरानगर पोलिसांची मदत मागितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. वाय. मेश्राम, सहायक निरीक्षक डी. आर. बावणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह लगेच धाव घेत बेले आणि मुंडेच्या मदतीने सशस्त्र आरोपींना घेराव घातला. त्यात चार उपरोक्त आरोपी सापडले. मात्र, रशीद खान हा मोटारसायकलने पळून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळ फणस कापण्याचे लोखंडी पाते, लोखंडी रॉड, दोन लोखंडी कटोनी, दोन लोखंडी टायर खोलण्याचे रॉड, १ टॉर्च, मिरची पावडर आणि एक मोटरसायकल असा एकूण ८६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. वाय. मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक डी. आर. बावणकर, पोलीस उपनिरीक्षक राठोड, बीट मार्शल सुरेश बेले, शरद मुंडे, हवालदार प्रकाश काळे, दीपक धानोरकर, नायक पोलीस शिपाई संतोष यादव, गजानन गोसावी, शिपाई चेतन जाधव यांनी ही कामगिरी बजावली. आरोपींकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.