धक्कादायक! अनियंत्रित कारने चार जणांना चिरडले; मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 04:53 PM2021-10-03T16:53:49+5:302021-10-03T18:13:06+5:30

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनियंत्रित झालेल्या भरधाव कारने चार प्रवाशांना चिरडल्याची धक्कादायक घटना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी ३ च्या सुमारास घडली. मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश आहे. तर, एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Four killed, one injured in car crash | धक्कादायक! अनियंत्रित कारने चार जणांना चिरडले; मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश

धक्कादायक! अनियंत्रित कारने चार जणांना चिरडले; मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील घटना : एक गंभीर जखमी

नागपूर : रस्त्यावर असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात अनियंत्रित कार दुभाजकारवर धडकली आणि सर्व्हिस रोडवर बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या पाच जणांना उडवित उलटली. यात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश आहे. 

ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी येथे रविवारी (दि. ३) दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली. बंडू ऊर्फ गौतम जागो सालवणकर (५५, रा. सातनवरी, ता. नागपूर ग्रामीण), शौर्य सुबोध डोंगरे (९), शिराली सुबोध डोंगरे (६) दोघेही रा. इसापूर, ता. मौदा व चिन्नू विनोद सोनबरसे (१३, रा. सातनवरी, ता. नागपूर ग्रामीण) अशी मृतांची नावे आहेत. या चौघांचाही उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला. या अपघातात ललिता बाबुलाल सोनबरसे (५०, रा. सातनवरी) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

हे पाचही जण सात सातनवरी येथील बस स्थानकाजवळ बसची प्रतीक्षा करीत उभे होते. त्यातच अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणारी अनियंत्रित कार खड्डा चुकविण्याच्या नादात सातनवरी येथील बस स्थानकाजवळील दुभाजकावर आदळली व लगेच सर्व्हिस रोडवर उलटली. तत्पूर्वी या सुसाट कारने रोडलगत उभ्या असलेल्या पाच जणांना जबर धडक दिली. त्यात पाचही जण गंभीर जखमी झाले. 

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पाचही जखमींना लगेच नागपूर येथील रुग्णालयात रवाना केले. मात्र, यातील चाैघांचा वाटेतच मृत्यू झाला. मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावासह अन्य एका मुलाचा समावेश आहे. जखमी महिलेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, खड्डयांबद्दल वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने चार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Four killed, one injured in car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.