चार लाखांत आरोग्य खात्याची नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:57+5:302021-06-06T04:06:57+5:30
आमिष दाखवून फसवणूक : जालन्यातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चार लाख रुपयांत आरोग्य खात्यात नोकरी ...
आमिष दाखवून फसवणूक : जालन्यातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार लाख रुपयांत आरोग्य खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जालना जिल्ह्यातील एका आरोपीने स्थानिक महिलेची फसवणूक केली. शंकर चैनसिंग जारवाल (वय ३०) असे आरोपीचे नाव असून, तो जालना जिल्ह्यातील रामदुलवाडी, बदनापूर येथे राहतो.
तक्रार करणाऱ्या मंजूषा रामेश्वर सदावर्ते (५८) नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील डायमंडनगरात राहतात. आरोपी त्यांच्या ओळखीचा आहे. मंजूषा यांचा मुलगा दहावी झालेला आहे. त्याला नोकरी मिळावी म्हणून त्या आपल्या ओळखीच्यांना शब्द टाकत होत्या. मंजूषा यांनी आरोपी जारवाल यालाही तीन वर्षांपूर्वी मुलासाठी नोकरी बघा, असे म्हटले होते. त्यावेळी आरोपीने मंजूषा यांच्या मुलाची दहावीची मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला घेतला. त्याला आरोग्य खाते किंवा पशुसंवर्धन खात्यात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले आणि त्या बदल्यात चार लाख रुपये घेतले. १४ मे २०१९ ला हा व्यवहार झाला. रक्कम घेऊन दोन वर्षे झाली, मात्र या दोन वर्षांत आरोपीने मंजूषा यांच्या मुलाला नोकरी लावून दिली नाही. तो बनवाबनवी करत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी आपली रक्कम परत मागितली असता आरोपीने त्यांना धमक्या देणे सुरू केले. त्यावरून मंजूषा यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. चौकशीअंती पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात शंकर जारवालविरुद्ध फसवणूक करून धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---