बिबट्याचे चार बछडे संगोपनासाठी गोरेवाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:02 PM2020-07-16T22:02:08+5:302020-07-17T00:25:38+5:30
आईपासून विभक्त झालेले बिबट्याचे चार बछडे संगोपनासाठी गोरेवाडा प्राणी बचाव केद्रांमध्ये गुरुवारी अकोलाच्या पातूर वन परिक्षेत्रातून आणण्यात आले. आईची प्रतीक्षा करूनही ती पिलांना घेण्यासाठी आलीच नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या व संगोपनाच्या दृष्टीने त्यांना आणण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईपासून विभक्त झालेले बिबट्याचे चार बछडे संगोपनासाठी गोरेवाडा प्राणी बचाव केद्रांमध्ये गुरुवारी अकोलाच्या पातूर वन परिक्षेत्रातून आणण्यात आले. आईची प्रतीक्षा करूनही ती पिलांना घेण्यासाठी आलीच नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या व संगोपनाच्या दृष्टीने त्यांना आणण्यात आले.
केद्रात आणल्यावर त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना विशेष कक्षात ठेवण्यात आले. हे बछडे १५ दिवसांपूर्वी ३० जूनला अकोलाच्या पातूर वन परिक्षेत्राजवळील मोर्णा नदीच्या किनाऱ्यावरील पास्तुल परिसरातील झुडुपात आढळले होते. पिलांना जन्म देऊन आई कुठेतरी निघून गेली. या संदर्भात वन विभागाला माहिती मिळाल्यावर पथकाने घटनास्थळी पोहचून पाहणी केली. पिलांना ताब्यात घेतले. या काळात पिलांची आई परत येण्याची शक्यता गृहित धरून काही दिवसपर्यंत त्यांना घटनास्थळी सुरक्षितपणे प्लास्टिक कॅरेटमध्ये ठेवण्यात आले. बछड्यांना दूध पाजून वन कर्मचाऱ्यांची निगराणी ठेवली. मात्र चारपाच दिवसानंतरही बिबट मादी न आल्याने वरिष्ठांना सूचना देण्यात आली. अखेर या पिलांना गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी दुपारी २.३० वाजता त्यांना पातूर वन विभागाच्या पथकाने येथे दाखल केले.