ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या मृत्यूची चार सदस्यीय समितीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 07:47 AM2021-01-19T07:47:02+5:302021-01-19T07:47:13+5:30

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून दखल : ऑक्सिजन गॅस प्लँटची तपासणी

A four-member committee inquired into the deaths of patients due to lack of oxygen | ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या मृत्यूची चार सदस्यीय समितीकडून चौकशी

ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या मृत्यूची चार सदस्यीय समितीकडून चौकशी

Next

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद झाल्याने एकामागोमाग एक अशा तीन रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेने सोमवारी राज्यात खळबळ उडाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. मेडिकल प्रशासनाने चार सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीला सुरुवात केली. सोबतच ऑक्सिजन गॅस प्लँटची थर्ड पार्टीकडून तपासणी करण्याचेही निर्देश दिले.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात १० चिमुकल्यांचे बळी जाण्याचे प्रकरण ताजे असताना मेडिकलच्या या घटनेने शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरचा ‘अतिदक्षता विभाग-१’मध्ये (आयसीयू) रविवारी पहाटे साधारण अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. यामुळे अर्ध्या-अर्ध्या तासाच्या कालावधीत तीन गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांना देण्यात आली. तातडीने उपाययोजना केल्याने उर्वरित सहा रुग्णांचे प्राण वाचले. या धक्कादायक घटनेला ‘लोकमत’ने समोर आणताच खळबळ उडाली.   

वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडून या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेत सखोल चौकशी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

डॉ. सुशांत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती मेडिकल प्रशासनाने ‘लोकमत’ला दिलेल्या पत्रानुसार अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी सोमवारी ‘आयसीयू-१’ची पाहणी केली. यात त्यांना ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पल्मनरी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. यात सदस्य सचिव वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गांवडे, सदस्य म्हणून मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील व बधिरीकरण विभागाचे प्रमुख वासुदेव बारसागडे यांचा समावेश आहे.

५५ ते ६६ टक्के होते रुग्णांचे ऑक्सिजन -
मेडिकलने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन प्रमाण खूपच कमी होते. नरेश मून यांचे ५७ टक्के (रुम एअरवर), अमोल नाहे यांचे ६६ टक्के (हाय फ्लो ऑक्सिजनवर), तर शिवराम शेंडे यांचे ५५ टक्के (रुम एअरवर) ऑक्सिजन होते. रुग्णांची प्रकृती अतिगंभीर होती.

Web Title: A four-member committee inquired into the deaths of patients due to lack of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.