विधीमंडळातील चार मुख्य प्रतोद व प्रतोद यांना ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:10 PM2017-12-11T22:10:51+5:302017-12-11T22:18:12+5:30
विधिमंडळातील मुख्य प्रतोद व प्रतोद यांना राज्य शासनातर्फे मंत्रिपद व राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यानुसार शिवसेनेच्या डॉ. नीलम गोरहे, सुनील प्रभू, भाजपचे राज पुरोहित, भाई गिरकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
योगेश पांडे
नागपूर : विधिमंडळातील मुख्य प्रतोद व प्रतोद यांना राज्य शासनातर्फे मंत्रिपद व राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यानुसार शिवसेनेच्या डॉ. नीलम गोरहे, सुनील प्रभू, भाजपचे राज पुरोहित, भाई गिरकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शासनातर्फे अधिसूचना काढण्यात आली असून विधिमंडळ सचिवालयालादेखील पत्राच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे. याची विधिमंडळात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
विधानमंडळातील मुख्य प्रतोद व प्रतोद यांना द्यावयाच्या सुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची ११ डिसेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत शासनाने यासंदर्भात निर्णयाला अनुसरून निर्णय घेण्यात आला. विधानसभेत सत्तारूढ पक्ष व घटक पक्षाचा एक मुख्य प्रतोद असेल. त्यानंतर एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के संख्या असणाºया पक्षांचे प्रत्येकी एक सदस्य प्रतोद असतील. यानुसार विधानसभेत भाजपकडून राज पुरोहित व शिवसेनेकडून सुनील प्रभू तर विधानपरिषदेत शिवसेनेच्या डॉ.नीलम गोरहे व भाजपचे भाई गिरकर हे मुख्य प्रतोद आहेत. मुख्य प्रतोदांना ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा राहील. दुसरीकडे विधानसभेत भाजपचे सुधाकर देशमुख, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे तर विधानपरिषदेत काँग्रेसचे संजय दत्त व राष्ट्रवादीचे हेमंत टकले हे प्रतोद आहेत. प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.