मनपात चार सदस्यीय प्रभाग, १५१ नगरसेवकही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 10:31 AM2022-08-04T10:31:08+5:302022-08-04T10:37:10+5:30
प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या निर्देशाची प्रतीक्षा; प्रभाग रचना नव्याने होण्याची शक्यता
नागपूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारी स्थगिती दिली. त्यामुळे आता नागपूर महापालिकेची निवडणूक ही २०१७ च्या चार सदस्यीय पद्दतीनेच होईल. १५६ पर्यंत वाढविण्यात आलेली नगरसेवकांची संख्याही पुन्हा १५१ होईल. प्रभाग रचना मात्र नव्याने होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या निर्णयानुसार २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी, तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. तसेच २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त महापालिका सदस्याची संख्या वाढणार आहे. ३१ मे २०२२ च्या मतदार यादीनुसार नागपूर शहरातील लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ इतकी आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढण्याला संधी नाही.
पाच जणांची संधी हुकली
तीन सदस्यीय प्रभाग रचनेत ५२ प्रभागातून १५६ नगरसेवक निवडून जाणार होते. म्हणजेच २०१७ च्या तुलनेत पाच नगरसेवक वाढणार होते. मात्र, आता चार सदस्यीय प्रभागानुसार ३८ प्रभागांतून १५१ नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे पाच नवीन नगरसेवकांची संधी हुकणार आहे.
ओबीसीच्या जागा पुन्हा घटणार
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत १५१ सदस्यांत ओबीसींच्या ४१ जागा होत्या. ओबीसी आरक्षणाची टक्केवारी घटल्याने तीन सदस्यीय प्रभाग रचनेत सदस्यांची संख्या वाढून १५६ झाली असतानाही ओबीसी संदस्यांची संख्या मात्र कमी होऊन ३५ झाली होती. आता १५१ सदस्यांत ओबीसीच्या जागा पुन्हा घटतील. या प्रवर्गासाठी ३३ जागा आरक्षित राहतील, असा अंदाज आहे.
महिला आरक्षणाची पुन्हा सोडत
२०११ च्या लोकसंख्येनुसारच सामाजिक आरक्षण निश्चित केले जाईल. त्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण जवळपास कायम राहील. ओबीसींच्या जागा आधीच्या तुलनेत कमी होतील. या तीन्ही संवर्गांसह खुल्या संवर्गातील जागांसाठीही महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढावी लागणार आहे.
चारच्या प्रभागांवर नागरिकांची नाराजी
चार सदस्यीय प्रभागात अनेक नगरसेवक प्रभागाकडे फिरकले नाहीत, विकास कामांबाबत एकमेकांकडे टोलवाटोलवी केली, अशी नागरिकांची नाराजी आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्सीय प्रभाग रचना केली असता त्यावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. एक किंवा दोन सदस्सीय पद्धतीने निवडणूक झाली तर नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करणे सोपे होते, असे नागरिकांचे म्हणणे होते. पण आता पुन्हा चारचा प्रभाग झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.