कॅन्सरबाधित मुलांसोबत घालविले सुखाचे चार क्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 08:21 PM2019-03-19T20:21:10+5:302019-03-19T20:22:49+5:30
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेली बच्चेकंपनी रुग्णालयातच होळी मिलन कार्यक्रमात रमली. या मुलांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण घालताना मेडिकलच्या कॅन्सर विभागाने त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फुलण्याची संधी दिली. विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी ही मुले खेळताना हळूवार भाविनक नातेही जुळले. या कार्यक्रमाने जगण्याच्या उमेदीचे बळ मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेली बच्चेकंपनी रुग्णालयातच होळी मिलन कार्यक्रमात रमली. या मुलांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण घालताना मेडिकलच्या कॅन्सर विभागाने त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फुलण्याची संधी दिली. विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी ही मुले खेळताना हळूवार भाविनक नातेही जुळले. या कार्यक्रमाने जगण्याच्या उमेदीचे बळ मिळाले.
गगन भरारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, जीविका फाऊंडेशन, नागपूरच्यावतीने मेडिकलच्या रेडिएशन थेरपी आणि ऑन्कोलॉजी विभाग व कॅनकिडस् किडस्कॅन फाऊंडेनशनच्यावतीने कॅन्सरग्रस्त मुलांसाठी होळी मिलनचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या मुलांना रंगीबेरंगी टोप्या घालून गुलाल लावण्यात आला. त्यांच्यासाठी विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. कृष्णा कांबळे, विभागप्रमुख डॉ. अशोक दिवाण, कविता ढाक, वैशाली चव्हाण, वर्षा पाटील, आशिष खडके उपस्थित होते.
यावेळी डॉ. कांबळे म्हणाले, चिमुकल्या वयात कॅन्सरचे दुखणे सोसावत असताना नाउमेद होत असलेले मन, तोच तो औषधांचा दर्प, यातच त्यांचे हरवत चालले बालपण याच जाणिवेतून काही वेळासाठी का होईना या कार्यक्रमामधून त्यांना वेगळ्या विश्वात नेले. त्यांच्यामध्ये जगण्याचा आत्मविश्वास निर्माण केला.
डॉ. दिवाण म्हणाले, घरात आधीच दारिद्र्य त्यात चिमुकल्याला जडलेला कॅन्सर. उपचार करण्याची परिस्थिती नसताना ते संघर्ष करीत आहेत, पण दारिद्र्यासमोर अनेकांचे प्रयत्न थिटे पडतात. यावर उपाय म्हणून या चिमुकल्यांच्या उपचारााठी त्यांना कुणी दत्तक घेतले तर चिमुकल्यांना नवजीवन मिळण्यास मदत होईल. चिमुकल्याला जगविण्याची पालकांची चिंता कमी होईल. अकाली होणारी ही कोवळी पानगळ थांबेल, असेही ते म्हणाले. यावेळी सहभागी मुलांना गाठी व भेटवस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पूजा बान्ते, पूजा, प्रियंका, रंजिता आदींनी सहकार्य केले.