सिंचन घोटाळ्यात आणखी चार गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:00 AM2018-08-19T00:00:03+5:302018-08-19T00:00:26+5:30
१७ आरोपींचा समावेश, नागपूर एसीबीची कारवाई
नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामाच्या निविदेदरम्यान गैरव्यवहार केल्याप्रकरणी नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वेगवेगळे चार गुन्हे दाखल केले. या गैरप्रकारात जलसंपदा विभागातील तत्कालीन अभियंते, लेखाधिकारी, कार्यकारी संचालकांनी कंत्राटदार आणि त्यांच्या भागीदारांचे संगनमत उघड झाल्यामुळे एसीबीने चार प्रकरणात १७ जणांना आरोपी बनविले आहे. या घडामोडीमुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत सिंचन गैरव्यवहाराच्या उघड चौकशीचे आदेश एसीबीला गेल्या वर्षी देण्यात आले होते. एसीबीच्या महासंचालकांनी एसीबी नागपूरचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वात पथकाची नियुक्ती केली होती.
आतापर्यंत २० गुन्हे दाखल
एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्या २० झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०१६ मध्ये प्रत्येकी एक असे दोन गुन्हे, एप्रिल २०१७ मध्ये दोन गुन्हे दाखल झाले. डिसेंबर २०१७ मध्ये चार, फेब्रुवारी २०१८ मध्ये सहा, जुलै २०१८ मध्ये दोन आणि १८ आॅगस्ट रोजी चार गुन्हे दाखल झाल्याने ही संख्या २० झाली आहे.