अतिरिक्त आयुक्तांसह मिळाले चार नवीन उपायुक्त
By admin | Published: April 30, 2017 01:38 AM2017-04-30T01:38:48+5:302017-04-30T01:38:48+5:30
शहरातील चार पोलीस उपायुक्तांच्या शुक्रवारी नागपुरातून बदल्या झाल्या. शिवाय सीआयडी, आरपीटीएस, एसीबी, लोहमार्ग पोलीस अधीक्षकांच्याही बदल्या झाल्या.
सीआयडी, आरपीटीएस आणि एसीबीतही नवीन अधीक्षक येणार
नागपूर : शहरातील चार पोलीस उपायुक्तांच्या शुक्रवारी नागपुरातून बदल्या झाल्या. शिवाय सीआयडी, आरपीटीएस, एसीबी, लोहमार्ग पोलीस अधीक्षकांच्याही बदल्या झाल्या. त्यांच्या बदल्यात नागपूरला एक अतिरिक्त आयुक्त आणि चार नवीन पोलीस उपायुक्त मिळाले. तर अन्य ठिकाणीसुद्धा नवीन अधिकारी बदलून येणार आहेत.
शुक्रवारी शहरातील रंजनकुमार शर्मा, अभिनाश कुमार आणि दीपाली मासिरकर तसेच राकेश कलासागर या चार पोलीस उपायुक्तांची बदली वेगवेगळ्या ठिकाणी झाली. त्याबदल्यात धुळ्याहून अतिरिक्त आयुक्त एस. दिघावकर, धुळे येथूनच पोलीस उपायुक्त म्हणून एस. चैतन्य, नाशिक (मालेगाव) मधून पोलीस उपायुक्त म्हणून राकेश ओला, जालना येथून पोलीस उपायुक्त म्हणून राहुल माकणीकर आणि सांगलीहून पोलीस उपायुक्त म्हणून कृष्णकांत उपाध्याय हे नवीन अधिकारी नागपुरात बदलून येणार आहेत. दोन ते तीन दिवसात हे सर्व नागपुरात रुजू होणार आहेत.
नागपुरातून गेलेले उपायुक्त
(कंसात बदलीचे ठिकाण)
रंजनकुमार शर्मा (अधीक्षक, अहमदनगर) अभिनाश कुमार (अधीक्षक, अमरावती), दीपाली मासिरकर (सहायक महानिरीक्षक, मुंबई) आणि राकेश कलासागर (अधीक्षक, अकोला) या अधिकाऱ्यांसोबतच गुन्हे अण्वेषण विभागाच्या डॉ. आरती सिंह (अधीक्षक, औरंगाबाद), पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप झळके (अधीक्षक, परभणी), लाचलुचपत विभागाचे अधीक्षक संजय दराडे (अधीक्षक, नाशिक), नागरी हक्क संरक्षण विभागाच्या निर्मलादेवी (अधीक्षक, वर्धा) आणि राज्य महामार्ग विभागाच्या स्वाती भोर यांची आरपीटीएस नागपूरच्या प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
नागपुरात येणारे अधिकारी
(कंसात येथून येणार)
अतिरिक्त आयुक्त एस. दिघावकर (धुळे), उपायुक्त एस. चैतन्य (धुळे), कृष्णकांत उपाध्याय (सांगली), राहूल माकणीकर (जालना), राकेश ओला (मालेगाव) हे अधिकारी अनुक्रमे नागपुरात येणार आहेत. याशिवाय पी. आर. पाटील पुण्याहून नागपुरात नागरी हक्क संरक्षण विभागात अधीक्षक, नाशिकचे उपायुक्त व्ही. जी. पाटील गुन्हे अण्वेषण विभागात अधीक्षक म्हणून नागपुरात रुजू होणार आहेत.(प्रतिनिधी)
एस. दिघावकर
अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभाग
धुळ्यात आतापर्यंत राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ६ ची जबाबदारी सांभाळणारे एस. दिघावकर यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मुंबईत काही काळ नोकरी केली आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून १९८९ ला ते उपअधीक्षक म्हणून रुजू झाले. अकोला, जळगाव, औरंगाबाद, जालना येथे सेवा दिल्यानंतर त्यांना २००१ मध्ये आयपीएस कॅडर मिळाला. उस्मानाबाद, बुलडाणा येथे अधीक्षक तर सोलापुरात उपायुक्त म्हणून सेवा दिली. त्यानंतर ते धुळे येथे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ६ ची जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांना पदोन्नती देऊन अतिरिक्त आयुक्त म्हणून सरकारने नागपुरात नियुक्ती दिली आहे.
एस. चैतन्य
धुळ्यात आतापर्यंत पोलीस अधीक्षकांची जबाबदारी सांभाळणारे एस. चैतन्य मूळचे तेलंगणातील रहिवासी असून, त्यांनी बी.टेक. केले आहे. पोलीस दलाचे आकर्षण असल्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि भारतीय पोलीस दलात त्यांची निवड झाली. २०११ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर, इचलकरंजी येथे सेवा दिल्यानंतर, ११ महिन्यांपूर्वी ते धुळ्याचे अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी येथील दारू विक्रेते आणि अवैध धंदेवाल्यांना लगाम लावतानाच हप्तेखोर पोलिसांवरही बदलीचा बडगा उगारला. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.
राहुल माकणीकर
गेल्या तीन वर्षांपासून जालना येथे माकणीकर कार्यरत आहे. २००८ ते २०१० या कालावधीत ते नंदूरबार तर, २०१० ते २०१३ पर्यंत परभणी, तेथून २०१५ पर्यंत फलटण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. २०१५ ते मार्च २०१७ पर्यंत ते जालना येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आता नागपुरात ते पोलीस पोलीस उपायुक्त म्हणून सेवा देणार आहेत.