‘त्या’ चार अनाथ मुलींचा फुलला संसार, श्रद्धानंद अनाथाश्रमात आयोजन
By दयानंद पाईकराव | Published: July 11, 2024 09:18 PM2024-07-11T21:18:38+5:302024-07-11T21:19:06+5:30
विविध संस्था, समाजसेवकांनी घेतला पुढाकार
नागपूर: अनाथ म्हटलं की आपलं जवळच असं कुणीच नसतं. त्यात लग्न समारंभ म्हटला की कुटुंबप्रमुखाला सर्वच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. परंतु श्रद्धानंदपेठेतील श्री श्रद्धानंद अनाथाश्रमात गुरुवारी पार पडलेला विवाह सोहळा याला अपवाद ठरला. अनाथाश्रमातील चार अनाथ मुलींच्या लग्नासाठी विविध संस्था, संघटना, समाजसेवक एकत्र आले. त्यांनी सोहळ्याची जय्यत तयारी केली अन् ‘त्या’ अनाथ मुलींचा सुखाचा संसार सुरु झाला.
श्रद्धानंदपेठ येथील श्री श्रद्धानंद अनाथालयात गुरुवारी ११ जुलैला सकाळी ११.१० वाजता अनाथालयाचे अध्यक्ष गोपाळराव बुटी, उपाध्यक्ष मिरा खडक्कार, सचिव डॉ. निशा बुटी, बालाजी बुटी, सहसचिव गीतांजली बुटी, कोषाध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी या विवाह सोहळ््याचे आयोजन केले. या विवाह सोहळ््यात शहराच्या विविध भागातील संस्थांनी सहभागी होऊन हळद, मेहंदी आणि जलग्रहण विधीचे आयोजन केले. यात गणेश टेकडी सेवा समितीने मोलाचे सहकार्य केले.
विवाह सोहळ्याला पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी उपस्थित राहून वधु-वरांना शुभाशिर्वाद दिले. तर नरेंद्र जिचकार, प्रशांत दुमुके, सचिन पुरोहित, डॉ. अभिजीत देव यांनी चारही मुलींचे कन्यादान केले. यावेळी सुमन मिश्रा, शशी तिवारी, कल्पना शुक्ला, प्रियल पांडे, लतिका त्रिपाठी, ममता तिवारी, ममता दुबे, किरण दुबे, दीपा पाचोरी, कीर्ती झा, रुची बोस, शिवानी सिंग आणि पिंकी दुबे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार अनाथ मुलींचा सुखाचा संसार सुरु झाल्याबद्दल विवाह सोहळ्याला उपस्थितांनी आनंद व्यक्त करून त्यांचा संसार सुखाचा होवो, असे आशिर्वाद दिले.