तीन अल्पवयीनांसह चौघांनी फोडले घर, सीसीटीव्हीमुळे आले ताब्यात; नागपुरातील घटना
By योगेश पांडे | Published: April 17, 2024 04:48 PM2024-04-17T16:48:20+5:302024-04-17T16:49:50+5:30
तीन अल्पवयीन मुलांसह चौघांनी एका ठिकाणी घरफोडी करत लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.
योगेश पांडे, नागपूर : तीन अल्पवयीन मुलांसह चौघांनी एका ठिकाणी घरफोडी करत लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. मात्र सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या नेटवर्कमुळे ते पोलिसांच्या ताब्यात आले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती व गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
रामचंद्र रमेश उमाळकर (५६, लाडीकर ले आऊट, मानेवाडा मार्ग) हे घराला कुलूप लावून बुलढाणा येथे लग्नाला गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिन्यासंह ९८ हजारांहून अधिकचा मुद्देमाल लंपास केला. उमाळकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातन पोलिसांनी शेख फैय्याज शेख हसन (२२, कुंदनलाल गुप्तानगर) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने तीन अल्पवयीन मुलांसह घरफोडी केल्याची कबुली दिली.
त्याच्या ताब्यातून ऑटोरिक्षा, लॅपटॉप, मोबाईल असा २.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक किरण कबाडी, मयुर चौरसिया, राजेश देशमुख, रवि अहीर, प्रशांत गभने, श्रीकांत उईके, निलेश श्रीपात्रे, सुधीर पवार व प्रविण रोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.