नागपुरात छेडखानीवरून सशस्त्र हल्ला , एकाच कुटुंबातील तिघांसह चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:34 PM2018-11-10T23:34:27+5:302018-11-10T23:35:54+5:30
बहिणीची छेड काढण्याचा आरोप लावून एका तरुणाच्या घरावर सशस्त्र आरोपीच्या टोळक्याने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी चाकू तसेच तलवारीने वार केल्याने सुनील अजित कोंडवाले (वय २३) हा, त्याची आई, वडील आणि मामा जबर जखमी झाले. या हल्ल्यामुळे जरीपटक्यातील गुरु तेगबहादूर सिंग नगरात शुक्रवारी रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहिणीची छेड काढण्याचा आरोप लावून एका तरुणाच्या घरावर सशस्त्र आरोपीच्या टोळक्याने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी चाकू तसेच तलवारीने वार केल्याने सुनील अजित कोंडवाले (वय २३) हा, त्याची आई, वडील आणि मामा जबर जखमी झाले. या हल्ल्यामुळे जरीपटक्यातील गुरु तेगबहादूर सिंग नगरात शुक्रवारी रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
दीपक ऊर्फ गोलू देशराज राजपूत (वय २२) त्याचे वडील देशराज राजपूत (वय ४८, रा. कडू ले-आऊट), हनी दीपक ठाकूर (रा. नारी रोड), राकेश राजपूत (वय २५, नारी), रफ्तार, राकेश आणि विक्की ठाकूर (वय २८, रा. गुरु तेगबहादूर नगर) अशी आरोपींची नावे आहेत. दीपक आणि सुुनीलचा काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सुनील हा बहिणीची छेड काढतो, असा आरोप करून दीपकने शुक्रवारी रात्री सुनीलसोबत वाद घातला. त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी सुनीलच्या डोक्याला जबर दुखापत झाली. मात्र, आपसातील वाद म्हणून बँडेज करून घेतल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार देण्याचे टाळले.
यानंतर शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास दीपक, त्याचे वडील आणि उपरोक्त साथीदारांनी सुनीलच्या घरावर हल्ला चढवला. त्याला शिवीगाळ करीत चाकू आणि तलवारीने मारहाण केली. मुलाचा जीव धोक्यात असल्याचे पाहून सुनीलची आई सुनिता तसेच वडील अजित आणि मामा महेंद्र राजपूत यांना मारहाण करून आरोपींनी त्यांच्यावरही तलवार तसेच चाकूचे घाव घातले. शिवीगाळ, आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच जरीपटक्याचे पोलीस तेथे पोहचले. तोपर्यंत तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. जखमींना मेयोत दाखल करण्यात आले. सुनील कोंडवालेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार पराग पोटे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शनिवारी रात्री मुख्य आरोपी दीपक राजपूतचे वडील देशराज आणि राकेश ठाकूर या दोन आरोपींना अटक केली. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
हॅप्पी दिवाळीने झाली वादाला सुरुवात
जरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी एकमेकांच्या दूरच्या नात्यात लागतात. त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणेही होते. दिवाळीच्या दिवशी सुनीलने आरोपीच्या बहिणीला दिवाळीच्या शुभेच्छा देताना ‘हॅप्पी दिवाळी’ असे म्हटले. येथूनच वादाला सुरूवात झाली अन् त्याचे पर्यवसान या प्राणघातक हल्ल्यात झाले.