महिलेच्या घरातून ४ पिस्तूल, २६ काडतुसे जप्त

By admin | Published: March 24, 2017 02:41 AM2017-03-24T02:41:25+5:302017-03-24T02:41:25+5:30

सक्करदरा पोलिसांनी बुधवारी रात्री मंगला दिलीप साळुंखे (वय ४५) हिच्या घरी छापा मारून चार पिस्तूल (माऊझर)

Four pistols, 26 cartridges seized from the woman's house | महिलेच्या घरातून ४ पिस्तूल, २६ काडतुसे जप्त

महिलेच्या घरातून ४ पिस्तूल, २६ काडतुसे जप्त

Next

सक्करदरा पोलिसांची कारवाई : कुख्यात गुन्हेगारांचे कनेक्शन
नागपूर : सक्करदरा पोलिसांनी बुधवारी रात्री मंगला दिलीप साळुंखे (वय ४५) हिच्या घरी छापा मारून चार पिस्तूल (माऊझर) आणि २६ जिवंत काडतुसे जप्त केली. तिला अटक करण्यात आली असून, तिच्याकडे हे पिस्तूल आणि काडतूस कुणाकडून आले, त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी यांनी पत्रकारांना दिली.
मंगला साळुंखे ही सक्करदऱ्यातील सेवादलनगर, भांडेप्लॉटमध्ये राहते. तिचा पती वेल्डिंगचे काम करतो, मात्र तो बहुधा घराबाहेरच राहतो. तिला दोन अल्पवयीन मुले आहेत. मंगला गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर बसून खेळणी विकते.
तिच्या घरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे दडवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक साजीद मोवाल यांना मिळाली. त्यांनी ती वरिष्ठांना कळविल्यानंतर मोवाल, सहायक निरीक्षक सतीश डेहनकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज ओरके, अमोल दाभाडे, शरद शिंपणे, शीतल हिरोडे, नायक आनंद जाजुर्ले, हवालदार संजय सोनवणे, शिपाई सुनील अतकरी, संदीप बोरसरे, राहुल वरखडे, अतुल चरडे, महिला शिपाई शुभांगी दातीर यांच्या पथकाने बुधवारी रात्री ८.३० वाजता मंगला साळुंखेच्या घरी धाड घातली.

बरीच शोधाशोध केल्यानंतर एका तांदळाच्या डब्यात पोलिसांना चार पिस्तूल आणि २६ जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी ती जप्त केल्यानंतर मंगला साळुंखेला पोलीस ठाण्यात आणले. कुख्यात गुन्हेगार अविनाश नवरखेले याने आपल्या घरी ठेवली होती, अशी माहिती दिली. हिंगणघाटहून गुन्हा करून कुख्यात नवरखेले मंगलाच्या परिवाराशी संबंधित एका लग्नात २७ एप्रिल २०१६ ला नागपुरात आला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने फायरिंग केली होती. यानंतर त्याला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी अटक करून त्याला कारागृहात डांबले.
नक्षल कनेक्शन नाही
रस्त्यावरून बसून खेळणी विकणाऱ्या गरीब महिलेच्या घरातून एवढी मोठी व महागडी शस्त्रे सापडल्याने तपास यंत्रणांची या घटनेकडे नजर वेधली गेली आहे. या प्रकरणात नक्षल कनेक्शन आहे का, अशी पत्रकारांनी विचारणा केली असता पोलीस उपायुक्त परदेशी यांनी ‘तूर्त अशी काही माहिती उघड झाली नाही’, असे सांगितले. विशेष म्हणजे, पिस्तुल नवे कोरे आहे. त्यांचा यापूर्वी वापर झाला नसल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. चारपैकी एका पिस्तुलाला सायलेंसरही लावले आहे. जप्त करण्यात आलेले काडतूसं सीलबंद असून, ती पॉइंट ३२ बोअरच्या परवाना प्राप्त लायसेन्ससाठी वापरली जातात. अर्थात् ज्यांच्याकडे पिस्तुल बाळगण्याचे लायसन्स आहे, अशांनाच हे काडतूस मिळतात. त्यामुळे लायसन्सच्या आधारे मिळणारी काडतूसं एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘दादाचे पत्र’ही सापडले
पोलिसांना मंगलाच्या घरात दिनेश गायकी या गुन्हेगाराने कारागृहातून लिहिलेली पत्रही सापडली. दिनेश आणि मंगलात भाऊ बहिणीचे नाते असल्याचा या पत्रातून अंदाज येतो. विशेष म्हणजे, महिलेच्या घराजवळच एका कुख्यात गुन्हेगाराचे घर आहे. ही शस्त्रे त्यानेच महिलेच्या घरात दडवून ठेवली असावी, असा संशय आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या महिलेच्या घरात पिस्तुल आणि काडतूस सापडल्याची नागपुरातील ही १० ते १५ वर्षातील पहिलीच घटना आहे. या घटनेशी अनेक गुन्हेगार संबंधित असल्याचा संशय उपायुक्त परदेसी यांनी व्यक्त केला. साळुंखे हिला कोर्टात हजर करून तिचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवण्यात आला असून, एसीपी कापगते आणि ठाणेदार आनंद नेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय केशव ठाकरे या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Web Title: Four pistols, 26 cartridges seized from the woman's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.