चार वाचता बार बंद, रस्त्यावर रिचविणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:20+5:302021-07-21T04:07:20+5:30
() शहरातील रस्त्यावर मोकळ्या मैदानात, उद्यानांमध्ये, निर्जनस्थळी भरतात मधुशाळा मंगेश व्यवहारे, विशाल महाकाळकर नागपूर : शहरातील रस्ते, मोकळे मैदान, ...
()
शहरातील रस्त्यावर मोकळ्या मैदानात, उद्यानांमध्ये, निर्जनस्थळी भरतात मधुशाळा
मंगेश व्यवहारे, विशाल महाकाळकर
नागपूर : शहरातील रस्ते, मोकळे मैदान, ओसाड पडलेली उद्याने, निर्जन स्थळांवर सायंकाळी चारचौघे एकत्र येऊन मधुशाळा भरविण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सरकारने कोरोनामुळे दारूची दुकाने व बीअरबारला ४ वाजतानंतर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सायंकाळी पिणाऱ्यांचे अड्डे आता शहरातील रस्ते व मोकळे मैदाने झाली आहेत.
शहरामध्ये प्रशासनाने ४ वाजताचा अलर्ट दिला आहे. ४ नंतर शहरातील व्यापारी पेठा व गल्लीबोळीतील दुकाने बंद होत आहे. दाररूच्या दुकानांच्या बीअरबारच्या बाबतीत हाच नियम आहे. शहरात बीअरबारची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बारमध्ये दारू पिणारे शौकीनही मोठ्या संख्येने आहेत. दुपारच्या तुलनेत सायंकाळी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी असते. पण पिण्यासाठी जागाच नसल्याने शौकिनांनी रस्ते, मोकळे मैदान, उद्यान, निर्जन स्थळांना दारूचे अड्डे बनविले आहे. दुपारीच पार्सल घेऊन सायंकाळी त्यांच्या मैफली भरताहेत. या प्रकारामुळे सामाजिक वातावरण दूषित होत आहे. वाढलेल्या या प्रकारांना आळा घालण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
- टीव्ही टॉवर चौक
सेमिनरी हिल्स परिसरातील टीव्ही टॉवर चौकात चार वाजतानंतर सर्व दुकाने बंद होतात. त्यामुळे वाहतूकही कमी असते. याचाच फायदा घेऊन परिसरातील युवक, असामाजिक तत्त्वे दुपारीच दारूचे पार्सल घेऊन संध्याकाळी दारूचा अड्डा भरवितात. वर्दळ कमी असल्याने रस्त्यावरच मधुशाळा भरलेली असते.
- फुटाळा परिसर
फुटाळा परिसरातील किरकोळ विक्रेते, पानठेले दुपारी ४ वाजतानंतर बंद होतात. परिसरात पोलिसांची गस्तही असते. पण पिणारे चांगलीच शक्कल लढवितात. बंद असलेल्या पानठेल्यात साहित्य ठेवतात. तरुण मंडळी तेथून दूर उभे राहून गप्पा करीत असतात. एक एक जण पानठेल्याजवळ जातो. दारू पिली की पुन्हा गप्पांमध्ये सहभागी होतो. हा प्रकार ना पोलिसांच्या लक्षात येत ना येणाऱ्या जाणाऱ्यांच्या.
- कॉटन मार्केट चौक
कॉटन मार्केट चौक व परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या परिसरात मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. ४ नंतर दारूची दुकाने बंद असल्याने ही मंडळी पूर्वीच सोय करून ठेवतात. दिवसभरातील कामे आटोपल्यानंतर घरी जाण्यापूर्वी चौकातील एका आडोशाच्या ठिकाणी मधुशाळा भरवितात. कुणाची रोकटोक नसल्याने हा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.
- कोण वाद घालणार यांच्याशी
गेल्या काही महिन्यांपासून सायंकाळी शहरातील अनेक ठिकाणी उघड्यावर दारू रिचविली जाते. पिणारे दारू पितात, दारूच्या पाण्याच्या बॉटल तेथेच सोडून जातात. जास्त दारू चढली की शिवीगाळ सुरू होते. कधीकधी गप्पा रात्री उशिरापर्यंत रंगतात. सामान्यजन हे सर्व प्रकार बघून त्यांच्याकडे पाठ दाखवून निघून जातात. तक्रार केली किंवा त्यांना हटकले तर उगाच भानगडी म्हणून दुर्लक्ष करतात.
पुरुषोत्तम राऊत, नागरिक
- तक्रार आली तर कारवाई करू
मुळात दारू पिणाऱ्यांच्या बाबतीत तक्रारी नागरिकांकडून येत नाही. पोलिसांची गस्त नियमित असते. गस्तीमध्ये दारू पिणारे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होते. नागरीकांनी तक्रारी केल्यास पोलीस त्याचा त्वरीत बंदोबस्त करेल, असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.