नागपुरात किराणा दुकानासह चार दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 06:42 PM2020-05-02T18:42:15+5:302020-05-02T19:01:11+5:30
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन किराणा दुकाने आणि गणेशपेठमधील एक मेडिकल स्टोअर्स अशी चार दुकाने एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी खळबळ उडविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन किराणा दुकाने आणि गणेशपेठमधील एक मेडिकल स्टोअर्स अशी चार दुकाने एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी खळबळ उडविली आहे.
शुक्रवारी सकाळी दुकान फोडीच्या या घटना उघडकीस आल्या. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्कासाथ परिसरात चोरट्यांनी आजूबाजूला असलेल्या कल्पेश ट्रेडर्स, संजय ट्रेडर्स आणि तुलसी खंडवी अशा तिघांची किराणा दुकाने गुरुवारी रात्री फोडली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी या दुकानातील किराणा किंवा खाद्यपदार्थाच्या वस्तूला हातही लावला नाही. त्यांनी तीनही दुकानातील एकूण दहा हजार रुपये चोरून पळ काढला.
विशेष म्हणजे, तीनही दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि ही चोरी केली. शुक्रवारी सकाळी चोरीच्या या घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील व्यापाऱ्यात खळबळ उडाली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून तहसील पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
अशाच प्रकारे कॉटन मार्केट चौकातील कैलास ओमप्रकाश साधवानी यांचे प्रकाश मेडिकल फोडले. आतमधील डिओ, फेस वॉश आणि अन्य सौंदर्य प्रसाधनांसह रोख दोन हजार रुपये, असा एकूण २९ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. दुकानातील सीसीटीव्हीत चोरीचे चित्रण झाले आहे. त्यानुसार गुरुवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी चोरटा दुकानाच्या छतावरील टिन उचकटून आत शिरला. त्याने दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून रोख तसेच सौंदर्यप्रसाधने लंपास केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर साधवानी यांनी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटवून चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत.