धामणगावातील चार विद्यार्थ्यांवर नागपुरात उपचार : अंगावर पडले गरम पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:46 AM2020-02-26T00:46:22+5:302020-02-26T00:47:25+5:30
हीटरचा नळ फुटल्याने आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर गरम पाणी पडून चार विद्यार्थी गंभीररीत्या भाजले. अमरावती, जुना धामणगाव येथील डॉ. मुकुंदराव पवार शैक्षणिक संकुलात ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हीटरचा नळ फुटल्याने आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर गरम पाणी पडून चार विद्यार्थी गंभीररीत्या भाजले. अमरावती, जुना धामणगाव येथील डॉ. मुकुंदराव पवार शैक्षणिक संकुलात ही घटना घडली. विद्यार्थ्यांना मंगळवारी रात्री नागपूरच्या आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
प्रीत किसन पराते (५), गणेश श्यामराव ठाकरे (९), शिवा नरेश चव्हाण (७), मोहित दीपक चव्हाण (७) अशी भाजलेल्या विद्यार्थ्याची नावे आहेत.
आॅरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या चारही विद्यार्थ्यांवर अमरावती येथील खासगी इस्पितळात प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री ७.३० वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात प्रीतची प्रकृती नाजूक आहे. तो ५२ टक्के भाजला आहे. गणेश ३०-३५ टक्के, मोहित ४४ टक्के तर शिव आठ टक्के भाजला आहे. या सर्वांवर अतिदक्षता विभागात तातडीचे उपचार सुरू आहेत. सध्या चारही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.