इन्स्पायर अवाॅर्डकरिता देशातील ६० बालसंशोधकांमध्ये राज्यातील चार विद्यार्थ्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 09:35 PM2022-01-01T21:35:39+5:302022-01-01T21:36:16+5:30
Nagpur News ८ सप्टेंबर २०२१ मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ६० टॉप मॉडेलची निवड करण्यात आली. यामध्ये राज्यातील चार विद्यार्थी मॉडेलचा समावेश आहे.
नागपूर : केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक कल्पनांना राष्ट्रीय स्तरावर प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी दरवर्षी इन्स्पायर अवाॅर्डचे आयोजन केले जाते. ८ सप्टेंबर २०२१ मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ६० टॉप मॉडेलची निवड करण्यात आली. यामध्ये राज्यातील चार विद्यार्थी मॉडेलचा समावेश आहे. निवड झालेल्या ६० ही मॉडेलचे प्रदर्शन राष्ट्रपती भवनात लागणार आहे.
देशभरातील शालेय विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी होतात. जिल्हास्तरावरून राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण विचारांची संस्कृती रुजविण्यासाठी, विज्ञानाच्या कल्पना, नवकल्पना पुढे याव्यात यासाठी इन्स्पायर अवाॅर्डचे आयोजन केले जाते. ८ सप्टेंबरला इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात राज्यातून ३७ मॉडेलची निवड झाली होती. यातून चार विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट पहिले ६० उत्कृष्ट मॉडेल म्हणून निवडले गेले.
या विद्यार्थ्यांचा समावेश
१) रिद्धी राहुल टिंगरे, भारती विद्यापीठ प्रायमरी इंग्लिश स्कूल, सांगली
२) प्रेम मनोहर गायकवाड, डी. डी. बिटको बॉइज स्कूल, नाशिक
३) अक्षय वसंत मोंढे, न्यू इंग्लिश स्कूल, नाशिक
४) जय संतोष भट, विद्यामंदिर, कणकवली, सिंधुदुर्ग
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे या चारही बाल संशोधकांचा सत्कार गुजरात येथे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते ५ जानेवारीला होणार असल्याची माहिती राज्य विज्ञान संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर यांनी दिली.