चार हजार कोटींच्या कर्ज थकबाकीचे प्रकरण : पद्मेश गुप्ताची काही संपत्ती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 08:50 PM2020-01-04T20:50:13+5:302020-01-04T20:51:45+5:30
तब्बल चार हजार कोटींची थकबाकी असलेल्या व वारंवार नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागपुरातील उद्योजक पद्मेश गुप्ता यांची काही संपत्ती शुक्रवारी प्रशासनातर्फे जप्त करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल चार हजार कोटींची थकबाकी असलेल्या व वारंवार नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागपुरातील उद्योजक पद्मेश गुप्ता यांची काही संपत्ती शुक्रवारी प्रशासनातर्फे जप्त करण्यात आली. सीताबर्डीतील एक फ्लॅट आणि वाडीतील तीन भूखंडाचा यात समावेश आहे. प्रशासनाने ही संपत्ती जप्त करून बँकेच्या स्वाधीन केली.
हजारो कोटीचे कर्ज परत न केल्याने नागपुरातील उद्योजक पद्मेश गुप्ता, अनुराधा गुप्ता, पीयूष मारोडिया यांची संपत्ती जुप्त करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने १६ जुलै २०१९ रोजी काढले होते. या आदेशानंतर तहसीलदार कार्यालयाकडून सात दिवसात थकबाकी भरण्याची नोटीस काढण्यात आली. या नोटीसीनंतरही थकबाकी न भरल्यानंतर नायब तहसीलदार सुनील साळवे यांच्या पथकाने जप्तीची कारवाई केली. यावेळी बँकेचे अधिकारीही होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गुप्ता यांनी बँक ऑफ इंडिया (लीड बँक), इंडियन ओव्हरसिस बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँ. लि., अलाहाबाद बँक, विजया बँक, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआयआय या बँकांकडून २ हजार ५४७ कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी बँकांनी थकबाकीदाराला दिलेल्या नोटिसीनुसार कर्जाचा आकडा ३ हजार ३२१ कोटी २२ लाख ३९ हजार २११ पर्यंत गेला हेता. वारंवार नोटीस देऊनही कर्जाची परतफेड न केल्याने हा आकडा आता ४ हजार कोटींच्या घरात गेला आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचे मूल्य थकबाकीच्या रकमेपेक्षा खूप कमी आहे. तेव्हा इतर थकबाकी केव्हा वसूल होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.