कंपनीचा फतवा..; आरोग्य विभागातील चार हजार डेटा एन्ट्री ऑपरेटर घरी बसणार
By गणेश हुड | Published: October 31, 2023 06:21 PM2023-10-31T18:21:33+5:302023-10-31T18:22:58+5:30
तीन वर्षांचा करार असताना दोन वर्षातच कार्यमुक्त
नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य विभागातील मंजूर पदावर बाह्ययंत्रणेव्दारे भरती करण्यात आलेल्या डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ असताना कंपनी त्यांना दोन वर्षातच त्यांना कार्यमुक्त करणार आहे. यामुळे चार हजार डेटा एन्ट्री ऑपरेटरला घरी जावे लागणार आहे.
आरोग्य विभागात मे. यशस्वी अकॅडमी फॉर स्कील. पुणे या संस्थेच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी तीन वर्षांच्या चार हजार डेटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना दरमहा ९ हजार रुपये मानधन दिले जाते. करारानुसार कंपनीने ऑपटरला एक वर्षानंतर १० टक्के तर दोन वर्षानंतर १५ टक्के मानधन वाढ देणे अपेक्षित होते. ऑपटरला वाढ न देता कार्यमुक्त करण्याची नोटीस कंपनीने दिली आहे. यामुळे महाराष्ट्र डेटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या आवाहनानुसार आरोग्य विभागातील कंत्राटी ऑपरेटर संपावर गेले आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत १०२ ऑपरेटर संपात सहभागी झाल्याने आरोग्य विभागाचे काम विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे कोविड काळापासून कार्यरत ऑपरेटरचा कालावधी संपण्यापूर्वीच त्यांना २० नोव्हेंबर २०२३ पासून कामावरुन कमी करण्यात आल्याबाबत कंपनीने कळविले आहे. दुसरीकडे कंपनीने नवीन डेटा एन्ट्री ऑपरेटरची भरती करण्याबाबतची प्रक्रीया सुरू केली आहे. तीन वर्षानंतर आपल्याला कायम करण्यात येईल. या आशेवर असलेल्या प्रशिक्षीत डेटा एन्ट्री ऑपरेटरांना कंपनीने एका फटक्यात बेरोजगार केले आहे.
जिल्ह्यातील ऑपरेटर संतप्त; सभापतींना निवेदन
कोविड कालावधीपासून आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या ऑपरेटरांना कंपनीने कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्यावर बेरोजगारीचे संकट आले आहे. ऑपरेटरला न्याय मिळावा, यासाठी महाराष्ट्र डेटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या नागपूर शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तिरबुडे, उपाध्यक्ष स्वप्नील वानखेडे, सचिव विशाल खंडाते, जितेंद्र मानकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. यावर त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक सुभाष बोरकर यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून कार्यरत ऑपरटरांना कमी करून बेरोजगार करू नका अशी सूचना केली. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्याशी चर्चा करून या संदर्भात आरोग्य अभियानातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून ऑपरेटरांना न्याय मिळावा, अशी सूचना केली.
आंदोलकांच्या मागण्या
-कंपनीने आरोग्य अभियानासोबत केलेला करार मोडल्याने कंपनीचा कंत्राट रद्द करावा.
-ऑपरेटरांना पहिल्या वर्षातील १० टक्के व दुसऱ्या वर्षातील १५ टक्के मानधन वाढ द्यावी.
- कार्यरत ऑपरेटरांना कामावरून कमी न करता कालावधी संपेपर्यंत ठेवावे, त्यानंतर कायम करावे.
-शासनाने मे. यशस्वी अकॅडमी फॉर स्कील कंपनीला काळया यादीत टाकावे.
-नवीन ऑपरेटरची नियुक्त करण्याचा आदेश रदद् करावा.