नागपूर जिल्ह्यात हत्तीपायाचे चार हजारांवर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 08:07 PM2020-02-29T20:07:33+5:302020-02-29T20:08:49+5:30
नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे; तर मागील वर्षात २१ नवीन रुग्णांची यात भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे; तर मागील वर्षात २१ नवीन रुग्णांची यात भर पडली आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत २ मार्चपासून उपचार मोहीम राबविली जाणार आहे. असे असले तरी सर्व जिल्हाभर हत्तीपाय दुरीकरणासाठी यंत्रणा मात्र नाही.
हत्तीपाय आणि हायड्रोसिल या दोन्ही आजारांचा जवळचा संबंध आहे. नागपूर जिल्ह्यात ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची रुग्णांची नोंद असून, या निम्मे म्हणजे २,१९१ हायड्रोसिल रुग्णांची नोंद झाली आहे तर नव्या २१ रुग्णांच्या रक्तांमध्ये हे जंतू आढळले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ३८ प्रभागांमध्येही ही रुग्णसंख्या अधिक आहे. शहरात ८८७ हत्तीपाय रुग्ण असून, हायड्रोसिलचे ५० रुग्ण आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड, विमानतळाचा काही भाग, कामठी, भिवापूर, सावनेर, कुही मांढळ, रामटेक या तालुक्यामध्ये हत्तीपायाचे रुग्ण अधिक आहेत. आरोग्य विभागाकडून उपलब्ध असलेल्या यंत्रणेकडून फक्त या भागातच हत्तीपाय दुरीकरणाची मोहीम राबविली जाते. अन्य ठिकाणी रुग्ण कमी असल्याची नोंद असल्याने उर्वारित भागात यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे या भागातील रुग्ण स्वत:हून तपासणीला आले किंवा आरोग्य विभागाच्या तपासणी मोहिमेत आढळले तरच या रुग्णांची नोंद होते, ही वस्तुस्थिती आहे.
केंद्राच्या सूचनेनुसार, यंदा २ मार्च ते १२ मार्च या काळात हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात मोहीम राबविली जात आहे; नंतरचे पुढील पाच दिवस मॉकअप राऊंड घेतला जाणार आहे. या मोहिमेत निवडलेल्या गरोदर माता, दोन वर्षांखालील बालके, अति गंभीर रुग्ण वगळता गोळ्यांची मात्रा खाऊ घातली जाणार आहे.
हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात मोहीम सुरू होत असून, आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्यासमक्ष गोळ्या देणार आहेत. या औषधोपचारानंतर किरकोळ गुंतागुंत आढळली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. औषधाचे फारसे गंभीर दुष्परिणाम नसतात. तरीही अशी गुंतागुंत आढळल्यास आरोग्य संस्थेच्या पातळीवर शीघ्र प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे.
डॉ. राहुल गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी, नागपूर
जंतु रात्री असतात सक्रिय
हत्तीपायाचे जंतू रात्रीच अधिक सक्रिय असतात. त्यामुळे रक्तनमुने रात्रीच घेतले जातात. एखाद्या रुग्णाला हत्तीपायाचा आजार जडल्यास रुग्णाच्या शरीरात १५ वर्षांपर्यंत जंतु सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे हत्तीपायाचा आजार झाल्याचे वेळीच लक्षात येत नाही. मात्र थंडी वाजून ताप येणे, जांघेत गाठी येणे अशी लक्षणे रुग्णामध्ये वारंवार दिसायला लागतात.