चार हजार शिवसैनिक मातोश्रीच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 09:05 PM2022-08-17T21:05:22+5:302022-08-17T21:05:54+5:30
Nagpur News नागपुरातही रामटेकचे खासदार कृपल तुमाने व आ. आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात सहभागी झाले. मात्र, मोठे नेते गेले असले तरी सामान्य शिवसैनिक व बहुतांश पदाधिकारी अद्यापही शिवसेनेतच कायम आहेत.
नागपूर : शिवसेनेत खिंडार पडल्यानंतर राज्यभरातील शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होणे पसंत केले. नागपुरातही रामटेकचे खासदार कृपल तुमाने व आ. आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात सहभागी झाले. मात्र, मोठे नेते गेले असले तरी सामान्य शिवसैनिक व बहुतांश पदाधिकारी अद्यापही शिवसेनेतच कायम आहेत.
आमचा अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच विश्वास असून, अखेरपर्यंत आम्ही शिवसेनेचा भगवाच खांद्यावर घेऊ, अशी शपथपत्रे सुमारे चार हजारांवर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भरून दिली आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये सुमारे दीड हजार, तर नागपूर शहरात सुमारे अडीच हजार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शपथपत्र भरून दिले आहेत. हे सर्व शपथपत्र पहिल्या टप्प्यात मुंबईला शिवसेना भवनात पाठविण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील शपथपत्रे घेऊन शहर व जिल्हाप्रमुख मुंबईला रवाना झाले आहेत.
प्रत्येक शाखेत सदस्य नोंदणी
- शिवसेनेची सदस्य नोंदणीची मोहीम गेली काही वर्षे थंडावली होती; पण शिवसेनेतील या बंडानंतर शिवसैनिक जागे झाले असून, कामाला लागले आहेत. आता प्रत्येक शाखेत जोमाने सदस्य नोंदणी केली जात आहे. यासाठी शिवसैनिकांना कुठलेही टार्गेट दिले नसून, ते स्वयंस्फूर्तपणे जबाबदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असून, त्यांना मी मी बिनशर्त पाठिंबा देत आहे. त्यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहील, अशी ग्वाही देत आहे, असे पदाधिकाऱ्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे.
कार्यकर्ता शिवसेनेसोबतच
- जिल्ह्यात शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम जोरात राबविली जात आहे. सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय नव्याने पक्षाची बांधणी केली जात आहे. बहुतांश पदाधिकारी पक्षासोबत असून, प्रामाणिकपणे काम करीत आहेत. येत्या काळात जिल्ह्यात पक्षाचे संघटन आणखी बळकट झालेले दिसेल.
- राजू हरणे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
आम्ही ताकदीने उद्धवजींसोबत
- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणे हे एक शिवसैनिक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य समजतो. पक्षाच्या या संकटाच्या काळात आम्ही ताकदीने शिवसेनेसोबत आहोत. नागपूर शहरात येत्या काळात शिवसेनेची ताकद आणखी वाढलेली दिसेल.
- किशोर कुमेरिया, महानगरप्रमुख, शिवसेना