महाराष्ट्रात दोन महिन्यांत रेल्वेच्या चार दुर्घटना टळल्या
By नरेश डोंगरे | Published: July 6, 2023 03:18 PM2023-07-06T15:18:56+5:302023-07-06T15:20:14+5:30
कर्मचाऱ्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला
नरेश डोंगरे
नागपूर : रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात रेल्वेच्या चार संभाव्य दुर्घटना टळल्या. सतर्कता दाखवून या दुर्घटना टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मध्य रेल्वेच्या वतिने बुधवारी सत्कार करण्यात आला. नागपूर, मुंबई, भुसावळ आणि सोलापूर विभागातील हे चार कर्मचारी आहेत.
सत्कार झालेल्यांमध्ये नागपूर विभागातील की-मेन गणेश युवाने यांचा समावेश आहे. ते धामणगावला राहतात. १३ मे रोजी ते धामनगाव - डेपोरी रेल्वेमार्गावर कर्तव्यावर होते. ट्रेन नंबर २२८४६ हटिया पुणे एक्सप्रेस या रेल्वेमार्गावरून धावत असताना त्यांना एका कोचखालून घर्षणामुळे स्पार्किंग होत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच या ट्रेनला थांबविण्यासाठी रेड सिग्नल दिला. मात्र, ट्रेन पुढे निघून गेली. त्यामुळे गणेश यांनी सर्व वरिष्ठांना संभाव्य दुर्घटनेची माहिती देऊन ट्रेन थांबविण्याची विनंती केली. शेवटी ओएचई सप्लाय बंद करून ट्रेनला थांबविण्यात आली. गणेश यांच्या या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
अशाच प्रकारे रेल्वेच्या मुंबई विभागातील सुनील पाटील (पॉईंटसमन, नेरूळ) यांनी ७ जूनला सकाळी जुई नगरातील एस अॅन्ड टी जंक्शन बॉक्समध्ये लागलेली आग तातडीने विझविण्यात महत्वाची भूमीका वठविली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
भूसावळ विभागातील रमेश सखाराम (ट्रॅक मेंटेनर, बडनेरा) हे २२ मे रोजी कर्तव्यावर असताना त्यांना बडनेरा यार्डच्या पॉईंट १२१ वर रेल्वे फ्रॅक्चर दिसला. रमेश यांनी त्या मार्गाने येणाऱ्या मालगाडीला रेड सिग्नल देऊन जागेवरच थांबविले. परिणामी मोठा अपघात टळला. तर, सोलापूर विभागातील वैभव शर्मा (सहायक लोको पायलट, कुर्दूवाडी) हे ११ जूनला कर्तव्यावर असताना बीम नंबर १ ची स्कॅनिंग करत होते. त्यांना मालगाडीच्या ट्रॅकची हेलिकल रिंग तुटलेली दिसली. हा प्रकार त्यांनी संबंधित वरिष्ठांच्या लक्षात आणून दिल्यानंतर लगेच दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे रेल्वे अपघात टळला.
उपरोक्त चारही कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना सतर्कता आणि प्रसंगावधान दाखविल्यामुळे चार रेल्वे अपघात टळल्याने या चारही कर्मचाऱ्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या हॉलमध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांच्या हस्ते रोख आणि प्रशस्तीपत्र देऊन या चाैघांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे कार्य प्रशंसनीय आणि अनुकरणीय असल्याचे यावेळी लालवानी यांनी आपल्या भाषणात म्हटले. मध्य रेल्वेच्या विविध विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.