चार गोदामांवर पुन्हा धाडी
By admin | Published: October 24, 2015 03:18 AM2015-10-24T03:18:06+5:302015-10-24T03:18:06+5:30
डाळ, डाळबिया, खाद्यतेल, बिया यांच्या वाढत्या भाववाढीला आळा घालण्याच्या दृष्टीने नागपूर जिल्हा पुरवठा विभागाने कंबर कसली आहे.
साठेबाजांविरुद्ध कारवाई सुरूच : २ कोटी ८२ लाखांचा धान्यसाठा जप्त
नागपूर : डाळ, डाळबिया, खाद्यतेल, बिया यांच्या वाढत्या भाववाढीला आळा घालण्याच्या दृष्टीने नागपूर जिल्हा पुरवठा विभागाने कंबर कसली आहे. शुक्रवारी पुन्हा कामठी येथील ४ गोदामांवर धाडी टाकून २ कोटी ८२ लाख १७ हजार ४५० रुपये किमतीचा कडधान्य व तेलबियांचा साठा जप्त करण्यात आला.
सावली फाटा कामठी येथील गुरुदेव वेअर हाऊस या गोदामावर धाड टाकून ७२३.२० क्विंटल चणा, वडोदा कामठी येथील शुभम लॉजिस्टिक या गोदामातून २५५८.८० क्विंटल चणा, १५४०.७० क्विंटल सोयाबीन, ८३.६० क्विंटल तूर साठा, सावली फाटा कामठी येथील खंडेलवाल वेअर हाऊस येथून ९६४ क्विंटल सोयाबीन आणि मेळघाट कोल्डस्टोरेज कामठी येथून ६३० क्विंटल सोयाबीनचा साठा जप्त करण्यात आला.
या चारही गोदामातून ३२८२ क्ंिवटल चणा, ३१३४.७० क्विंटल सोयाबीन, ८३.६० क्विंटल तुरीचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी एन.आर. वंजारी, अन्नधान्य वितरण अधिकारी आर.डी. बेंडे, तहसीलदार समर्थ व पुरवठा निरीक्षक प्रशांत शेंडे यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)