कालव्यात मृतदेह, अन् आईचा हंबरडा.... कुठे शोधू रे तुला बॉबी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 10:54 AM2022-01-04T10:54:23+5:302022-01-04T11:14:11+5:30

तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या बॉबीचा मृतदेह अखेर सुरादेवी शिवारातील कालव्यात आढळला. पतंग पकडण्यासाठी धावत गेलेला बॉबी कालव्यात पडला अन् बुडून मरण पावला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

four year old bobby found dead in suradevi canal koradi after three days he was reported missing | कालव्यात मृतदेह, अन् आईचा हंबरडा.... कुठे शोधू रे तुला बॉबी..!

कालव्यात मृतदेह, अन् आईचा हंबरडा.... कुठे शोधू रे तुला बॉबी..!

Next
ठळक मुद्देपतंगाने केला घातगावापासून तीन किलोमीटरवर पात्रात आढळले लहानग्याचे कलेवर

नागपूर : चार वर्षांचा लहानगा बॉबी..., आपल्या बागडण्याने अंगण मोहरविणारा.... शेजाऱ्यापाजाऱ्यांचा लाडका. पण तीन दिवसापूर्वी तो अचानकपणे बेपत्ता झाला. सर्वत्र शोध घेतला. गाव पालथा घातला. अखेर नको ती बातमी कानावर आली. सुरादेवी शिवारातील कालव्यात गावापासून तीन किलोमीटर अंतरावर त्याचे प्रेत आढळले. आभाळ कोसळावे  अशी साऱ्यांची अवस्था झाली. आईला कळताच तिने हंबरडा फोडला. आता कुठे शोधू रे तुला बॉबी...!

बॉबी ऊर्फ आनंद पंकज सोमकुवर (४ वर्ष) असे वा लहानग्याचे नाव. शनिवारी दुपारी घरासमोर खेळत असलेला बॉबी अचानक बेपता झाल्याने शंकाकुशंकासह उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधाशोध सुरू केली. तिकडे बॉबीचे अपहरण झाल्याची जोरदार चर्चा सर्वत्र पसरल्याने शहर आणि ग्रामीण पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली होती. श्वान पथकासह, सीसीटीव्हीचाही बॉबीच्या तपासासाठी आधार घेण्यात आला होता.

बॉबी कालव्याच्या कडेला दिसल्याने रविवारपासून पोलिसांनी या परिसरातून वाहणाऱ्या कालव्याकडे लक्ष केंद्रित केले. सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी १२ जलतरणपटूंना बोलवून त्यांना कोराडी मंदिराच्या पलीकडे सुरादेवी भागात शोधमोहिम राबविण्यास सांगितले. कालव्याच्या पाण्याचा प्रवाहही बंद करण्यात आला. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास सुमारे ३ किलोमीटर दूर बॉबीचा मृतदेह आढळला. ही वार्ता कळताच बॉबीच्या घरासमोर मोठी गर्दी जमा झाली.

बॉबी बेपत्ता झाल्यापासून त्याच्या कुटुंबीयांचा घास कडू झाला होता. आई पल्लवी, वडील पंकज आणि घरातील सर्वच सदस्यांसह नातेवाईकही तो सुखरूप मिळावा म्हणून धावपळ करीत होते. कालव्यात त्याचा मृतदेह आढळल्याचे कळाल्यानंतर त्याची आई पल्लवी, वडील, आजी आजोबा दुखावेगाने निशब्द झाले होते. त्यांना धीर देण्यासाठी आलेल्यांनाही शोक आवरत नव्हता.

बॉबी चुणचुणीत आणि खेळकर होता. आजुबाजुच्या घरातही त्याचा मुक्त वावर होता. त्यामुळे शेजाऱ्यांचाही तो लाडका होता. त्याच्या आईने कुठे शोधू रे बॉबी तुला म्हणत टाहो फोडला अन् अनेकांच्या काळजाचे पाणी झाले. दरम्यान, पतंग पकडण्यासाठी धावत गेलेल्या बॉबीचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपासातील अंदाज आहे. वैद्यकीय अहवालानंतर तो खरा की खोटा हे स्पष्ट होईल. मात्र, बॉबीचे वडील पंकज सोमकुवर यांना घातपाताचा संशय आहे. पोलिसांनी सखोल तपास करून वास्तव उघड करावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.

जबाबदार कोण?

ज्या कालव्यात चॉबीचा मृतदेह आढळला तो कालवा कोराडी महादुला भागातून सुरादेवी, कवठा, स्वशाळा मार्गाने पुढे वडोटा व गुमथळ्याकडे जातो. या भागातील शेतीला कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. महादुला मंदिर टी-पॉईट ते देवी मंदिर परिसरापर्यंत वायर स्लॅब टाकण्यात आली आहे. कोराडी परिसरात हा कालवा तायवाडे कॉलेजकडून पुढे खुला आहे. कसलाही कठडा नाही. ही माहिती नसलेली व्यक्ती अथवा प्राणी कालव्यात पडू शकतो. बॉबीही असाच या कालव्यात पडला. त्यामुळे त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तिने बघितले, मात्र...

पोलिसांच्या माहितीनुसार, पतंग पाहून बाॅबी कालव्याकडे धावत गेला अन् कालव्यात पडून मृत झाला. त्याला कालव्यात पडताना दुसऱ्या काठावरून एका मुलीने बघितले. बॉबीचे केस लांब असल्याने तो मुलगा की मुलगी याचा अंदाज त्या सहा वर्षीय मुलीला लावता आला नाही.

Web Title: four year old bobby found dead in suradevi canal koradi after three days he was reported missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.