टीव्हीच्या सेट टाॅप बाॅक्सला स्पर्श करताच झाले होत्याचे नव्हते, नागपुरातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:56 AM2023-08-09T10:56:03+5:302023-08-09T10:58:51+5:30
खैरी (पन्नासे) येथील घटना
हिंगणा : खेळता-खेळता चार वर्षीय बालकाने टीव्हीच्या सेट टाॅप बाॅक्सला स्पर्श केला आणि त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. या धक्क्यामुळे त्या बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैरी (पन्नासे) येथे मंगळवारी (दि. ८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्रियांशू ज्ञानेश्वर चव्हारे (४, रा. खैरी पन्नासे- नवीन, ता. हिंगणा) असे मृत बालकाचे नाव आहे. प्रियांशू नेहमीप्रमाणे घरात खेळत हाेता. त्याचे वडील पहाटे शेतातून घरी आल्याने ते आराम करीत हाेते तर आई, आजी आणि आजोबा शेतात मजुरीला गेले हाेते. मात्र, घरातील टीव्ही सुरू हाेता. त्यातच खेळता-खेळता प्रियांशूने त्या टीव्हीच्या सेट टाॅप बाॅक्सला स्पर्श केला आणि त्याला जाेरात विजेचा धक्का लागला.
त्याच्या खाली काेसळण्याच्या आवाजामुळे वडिलांना जाग आली. त्यांनी प्रियांशूला लगेच बेशुद्धावस्थेत हिंगणा शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
मुलांना विजेच्या उपकरणांपासून दूर ठेवा
लहान मुले औत्सुक्यापाेटी कशालाही स्पर्श करतात किंवा काेणत्याही छाेट्या वस्तू उचलून ताेंडात टाकतात. बहुतांश नागरिक घरातील विद्युत पुरवठा आणि विजेच्या उपकरणांची तपासणी करणे किंवा त्याचे ऑडिट करण्याच्या भरीस पडत नाही. घरात अपघात हाेऊ नये म्हणून किमान लहान मुलांचा विजेच्या काेणत्याही उपकरणाला स्पर्श हाेणार याची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणेदार विशाल काळे यांनी केले आहे.