सावळी शिवारात आढळला चारवर्षीय मृत बिबट्या, मृत्यूचे कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 01:40 PM2023-11-09T13:40:57+5:302023-11-09T13:47:49+5:30
नमुने तपासणीसाठी प्रयाेगशाळेत
कळमेश्वर (नागपूर) : वनपरिक्षेत्रातील सावळी (खुर्द), ता. कळमेश्वर शिवारातील एका शेताच्या धुऱ्यावर मंगळवारी (दि. ७) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याचे वय चार वर्षे असून, नमुने नागपूर शहरातील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बिबट्याच्यामृत्यूचे नेमके कारण कळेल, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
सावळी (खुर्द) शिवारात रत्नप्रभा अरविंद कुकडे व पेठे या दाेघांची शेती असून, त्यांच्या शेताच्या धुऱ्यावर हा बिबट्या मृतावस्थेत पडून असल्याचे काही शेतकऱ्यांनी बघितले. त्यामुळे संदीप सावरकर यांनी सरपंच मंगेश चाेरे यांना कळविले आणि मंगेश यांनी लगेच वन विभागाचे शिरपूरकर यांना माहिती दिली.
वन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असून, त्याचा मृत्यू दाेन दिवसांपूर्वी झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण सध्या तरी स्पष्ट झाले नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून, शरीराचे महत्त्वाचे नमुने प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा रिपाेर्ट आल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण कळेल, अशी माहिती सहायक वनसंरक्षक आर. एम. घाडगे यांनी दिली. यावेळी घटनास्थळी वनअधिकारी पी. आर. शिरपूरकर, राऊंड ऑफिसर ए. जी. खडोतकर, वनरक्षक गोविंदा मेंढे, डॉ. ईसोज सोमकुरवार यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित हाेते.