चार वर्षांत वाघांच्या हल्ल्यात १०१ नागरिकांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:39+5:302021-02-11T04:10:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे, यातील १०१ जणांचा जीव वाघाच्या हल्ल्यात गेला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी, २०१७ ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, पीडित किंवा त्यांच्या नातेवाइकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पशुधनाचे किती प्रमाणात नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. या संदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार चार वर्षांच्या कालावधीत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१४ नागरिकांचा बळी गेला. २०१७ मध्ये हा आकडा ५४ इतका होता. मात्र, २०२० मध्ये सर्वाधिक हल्ले झाले व त्यात ८८ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईपोटी २६ कोटी ४ लाख रुपयांची मदत करण्यात आली. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना १२ लाख १६ हजार ८२२ रुपयांची मदत मिळाली.
वाघानंतर बिबट्याच्या हल्ल्यात ६५ जणांना जीव गमवावा लागला, तर रानडुकरांनी २० व अस्वलांनी १५ नागरिकांचा बळी घेतला.
३० हजारांहून अधिक पाळीव प्राणी भक्ष्यस्थानी
या कालावधीत ३० हजार ४३९ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले, तर ४६४ जखमी झाले. २०१९-२० या वर्षात सर्वाधिक ९ हजार २५८ प्राण्यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी ७२ लाख २७ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व मदत
वर्ष-मृत्यू- एकूण मदत
२०१७ - ५४ -४,३२,००,०००
२०१८ - ३३ -३,१२,००,०००
२०१९ - ३९ -५,८५,००,०००
२०२० - ८८ -१२,७५,००,०००
या प्राण्यांनी घेतले बळी
गवा -४
बिबट्या - ६५
वाघ - १०१
अस्वल- १५
हत्ती-२
नीलगाय-२
लांडगा -२
रानडुक्कर- २०
मगर -१
इतर-२