चार तरुण बुडाले
By admin | Published: September 7, 2015 02:46 AM2015-09-07T02:46:23+5:302015-09-07T02:46:23+5:30
पिकनिकसाठी गेलेल्या नागपूरच्या चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास कन्हान नदीच्या महादुला पुलाजवळ ही घटना घडली.
पिकनिक जीवावर बेतली : कन्हान नदीच्या महादुला पुलाजवळील घटना
नागपूर : पिकनिकसाठी गेलेल्या नागपूरच्या चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास कन्हान नदीच्या महादुला पुलाजवळ ही घटना घडली. यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
नागपूरच्या विविध भागात राहाणारे सहा तरुण मित्र रविवारी वाकी परिसरात पिकनिकला गेले होते. दुपारी ४ च्या सुमारास खाणेपिणे झाल्यानंतर हे सर्व कन्हान नदीच्या महादुला पुलाकडे गेले. पोहणे येत नसताना त्यातील एक जण पाण्यात उतरला. त्याला पाहून दुसराही पाण्यात गेला. हे दोघे काही वेळेतच गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी अन्य दोघांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, पाणी अधिक जास्त असल्यामुळे हे चारही जण पाण्यात दिसेनासे झाले. काठावर उभे असलेल्या दोघांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. मात्र, ज्या ठिकाणी हे तरुण बुडले. त्या ठिकाणी पाण्याचा जोरदार प्रवाह असल्यामुळे इतरांनी पाण्यात उतरण्याची हिम्मत दाखवली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पारशिवनीचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी मासेमारी करणारांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मृतांची नावे
पाण्यात बुडून मरण पावलेल्यांची नावे पिंटू ऊर्फ विलास धनराज धामडे (वय २५), रमेश रामराज यादव (वय २८), प्रवीण श्रीराम पंजारे (वय २७) आणि मंगेश डहाट अशी आहे. हे सर्वच्या सर्व जरीपटका ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे समजते. त्यांच्या सोबत असलेले मात्र पाण्यात न उतरल्यामुळे बचावलेल्यांची नावे दिनेश माते आणि सतीश कोटांगळे आहे. ते टेकानाका भागातील रहिवासी असल्याचे पोलीस सांगतात.