महिनाभरात चारपट वाढ; विलगीकरणात ६५०१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:10 AM2021-03-04T04:10:07+5:302021-03-04T04:10:07+5:30
चिंता वाढली : मनपा प्रशासन सतर्क झाले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा ...
चिंता वाढली : मनपा प्रशासन सतर्क झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण संख्या वाढत आहे. शहरात १ फेब्रुवारी रोजी घरीच विलगीकरणात असलेल्यांची संख्या १ हजार ५६६ इतकी होती. ती २ मार्चला ६५०१ म्हणजेच चार पटीने वाढली आहे.
जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु महिनाभरात नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. सातत्याने रुग्ण वाढ होत असल्याने घरीच विलगीकरणात असलेले नागरिक घराबाहेर पडण्यावर कडक निर्बंध घातले आहे. अशा रुग्णांच्या हातावर शिक्के मारण्याचे आदेश दिले असून घराबाहेर पडल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने पुन्हा एकदा तपासणी केंद्रांची संख्या वाढविली आहे. जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या २०० पर्यंत खाली आली होती. आता ती ९०० पर्यंत गेली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ३२५५ पर्यंत खाली आली होती. ती आता ८८४४ पर्यंत गेली आहे.
रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. ७ मार्चपर्यत आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांना ५० पेक्षा कमी उपस्थिती बंधनकारक केली आहे.
....
दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपुरात अधिक रुग्ण
गेल्या वर्षी सुरुवातीला मध्य नागपुरात सर्वाधिक कोरोना रुग्ण होते. यावेळी दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपुरातील लक्ष्मीनगर झोनमधील आहे. त्यानंतर दक्षिण रुग्ण संख्या आहे. हॉटस्पॉट भागावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, ट्रेसिंग व टेस्टिंगवर भर दिला जात आहे. याचे चांगले परिणाम दिसत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.