चौदाव्या वित्त आयोगाचा ग्रा.पं.ला ३७.६३ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 09:46 PM2019-09-23T21:46:26+5:302019-09-23T21:47:28+5:30
चौदाव्या वित्त आयोगातून यंदा जिल्ह्याला ३७ कोटी ६३ लक्ष १७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने नुकताच हा निधी ग्राम पंचायतींच्या खात्यावरही वळता करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चौदाव्या वित्त आयोगातून यंदा जिल्ह्याला ३७ कोटी ६३ लक्ष १७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने नुकताच हा निधीग्राम पंचायतींच्या खात्यावरही वळता करण्यात आला आहे. निधीचे वितरण लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारावर झाले आहे. त्यामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जास्त अनुदान मिळणार आहे.
वित्त आयोगाच्या निधीवर आता जिल्हा परिषदेचा हस्तक्षेप राहिलेला नाही. हा निधी कसा आणि कुठे खर्च करावा याचे अधिकार आता ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्याऐवजी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. याशिवाय सरपंचाच्या अधिकारातही राज्य सरकारने वाढ केली आहे. जनतेतून थेट सरपंच निवडला जाणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या जनरल बेसिक ग्रँटच्या पहिल्या हप्त्याची रक्कम केंद्र शासनाने दिली आहे. ही रक्कम राज्य शासनाकडून जिल्ह्यांना वर्ग करण्यात आली. ९० टक्के निधीचा विनियोग ग्रामपंचायतींना सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांसाठी खर्च करावा लागणार आहे. १० टक्के निधीचा वापर प्रशासकीय तांत्रिक बाबींसाठी करायचा आहे. त्यानुसार पहिला हप्ता ३७ कोटी ६३ लाख १७ हजार जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाला प्राप्त झाला होता. त्यानुसार पंचायत विभागाने सदरचा निधी जिल्ह्यातील एकूण ७६९ ग्राम पंचायतींच्या बँक खात्यावर वळताही केला आहे.
तालुकानिहाय निधीचे वितरण
तालुका निधी
नागपूर ४,१०,१०,५१२
कामठी २,६०,७८,२१४
हिंगणा ४,३१,७०,२१८
कळमेश्वर २,००,५९,४४७
काटोल २,८८,८४,७७६
नरखेड २,७३,१७,६९१
सावनेर ३,९७,४७,२८५
पारशिवनी २,३४,६५,६०१
रामटेक ३,०४,५१,८०६
मौदा २,८८,९३,३६१
उमरेड २,४३,९७,८११
भिवापूर १,६५,६०,५२६
कुही २,६२,७९,७५२
--------------------------------
एकूण - ३७,६३,१७,०००