नागपुरातील मनपाच्या चकोले दवाखान्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारीच वाटतो औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:52 AM2019-07-15T10:52:15+5:302019-07-15T10:58:44+5:30
नागपुरातील गरोबा मैदान जुना बगडगंज येथील मनपाच्या सखाराम चकोले दवाखान्यात फार्मासिस्टची गरजच नसल्याचा प्रकार सुरू आहे. येथे चक्क चतुर्थश्रेणी कर्मचारी रुग्णांना औषधे देतो.
सुमेध वाघमारे/
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चुकीची औषधे दिल्याने रुग्णांना अपाय होऊन मृत्यूही होऊ शकतो. म्हणूनच, डॉक्टरांएवढीच फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची असते. परंतु गरोबा मैदान जुना बगडगंज येथील मनपाच्या सखाराम चकोले दवाखान्यात फार्मासिस्टची गरजच नसल्याचा प्रकार सुरू आहे. येथे चक्क चतुर्थश्रेणी कर्मचारी रुग्णांना औषधे देतो. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार येथेच थांबत नाही. येथील महिला डॉक्टर स्टेथोस्कोपचा वापर न करता, रुग्णाला हात न लावता केवळ रुग्णाच्या सांगण्यावरून औषधे देत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून समोर आले.
प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर नागपूर मनपाला पडल्याचे दिसून येत आहे. ‘लोकमत’चमूने शनिवारी गरोबा मैदान जुना बगडगंज येथील सखाराम चकोले दवाखान्याला भेट दिली. बाह्यरुग्ण विभागापुरतेच (ओपीडी) मर्यादित असलेल्या या दवाखान्याची जबाबदारी डॉ. मंजू वैद्य यांच्यावर आहे. याशिवाय फार्मासिस्ट, एक परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचारी मदतीला आहेत. या कर्मचाऱ्याकडे सफाईच्या कामाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात येते परंतु फार्मासिस्ट आपले काम सोडून रुग्णांकडून नोंदणी शुल्क आकारत होते. तर त्यांच्या जागेवर सफाई कर्मचारी हा रुग्णांना औषधे देण्याचे काम करीत होता. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे येथे नेहमी येणारे नागरिक सांगतात. अनुचित घटना घडण्याच्या प्रतीक्षेतच रुग्णालय प्रशासन असल्याचे यातून दिसून येते.
स्टेथास्कोपचा वापर केव्हा?
डॉ. वैद्य यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला औषधे लिहून दिल्यावर ‘कफ’ असलेला एक रुग्ण त्यांच्याकडे गेला. त्या रुग्णालाही हात न लावता किंवा स्टेथास्कोप न लावताच औषधे लिहून दिली. टेबलावर असलेला स्टेथास्कोपचा वापरच होत नसल्याचे रुग्णालयात नेहमी येणाऱ्या एका रुग्णाने सांगितले. येथे मजबुरीने यावे लागते, अशी बोलकी प्रतिक्रियाही त्याने दिली.
असे केले ‘स्टिंग ऑपरेशन’
शनिवारी सकाळी १०.३० वाजता ‘लोकमत’ प्रतिनिधी चकोले दवाखान्यातील शुल्क भरण्याच्या रांगेत लागला. येथे रोशन पाटील नावाची व्यक्ती हे शुल्क घेण्याचे काम करीत होती. प्रतिनिधीने आपले नाव बदलवून त्यांच्याकडे १० रुपयाचे शुल्क भरले. त्यांनी दिलेल्या पावतीला घेऊन प्रतिनिधी डॉ. मंजू यांच्या कक्षात गेला. डॉ. मंजू यांनी बसायला न लावताच उभ्या उभ्यानेच काय झाले विचारले. प्रतिनिधीने पोटात दुखत असल्याचे सांगताच तीन औषधांची नावे लिहून चिठ्ठी हातात दिली. औषधांच्या रांगेत लागल्यावर सफाई कर्मचाऱ्याने तीन विविध प्रकारची औषधे दिली. हे कुठले औषध आहेत, असे विचारल्यावर त्याने सकाळ-संध्याकाळ औषध घेण्याचे उत्तर देऊन खिडकी सोडण्याचा इशारा केला.
दवाखान्यातून औषधांची जाहिरातही
या दवाखान्यात रुग्णांना कागदाच्या एका पाकिटात औषध टाकून दिले जाते. धक्कादायक म्हणजे, या पाकिटाच्या दोन्ही बाजूला औषधांची जाहिरात छापलेली आहे. एका बाजूला पाठदुखी, सांधेदुखी, स्नायूदुखीवरील मलमाची जाहिरात तर दुसऱ्या बाजूला डास पळविणाऱ्या क्रीमची जाहिरात आहे.