जेईई-मेन्सचा चौथ्या टप्प्याचा निकाल घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:24+5:302021-09-16T04:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-मेन्स’च्या ऑगस्ट महिन्याच्या परीक्षेचा निकाल लागला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-मेन्स’च्या ऑगस्ट महिन्याच्या परीक्षेचा निकाल लागला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या चार संधींपैकी ही अखेरची परीक्षा होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘स्कोअर’ हा ९९ पर्सेंटाईलहून अधिक होता. विविध कोचिंग क्लासेसकडून मिळालेल्या माहितीनुसार, इफ्रा खान हिने ९९.९९ पर्सेंटाईल ‘स्कोअर’ प्राप्त करीत उपराजधानीतून अव्वल स्थान पटकाविले आहे.
कोरोनामुळे ‘जेईई-मेन्स’च्या चौथ्या टप्प्याची परीक्षा २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली. नागपूर तसेच विदर्भातील विविध महाविद्यालयातून सात हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नागपुरातून ही परीक्षा दिली. प्राप्त माहितीनुसार, यश कवाडे याने ९९.९५८ पर्सेंटाईलचा ‘स्कोअर’ मिळविला. तर चिन्मय भुसारी (९९.९५६ पर्सेंटाईल), रैवत बापट (९९.९४ पर्सेंटाईल), वेदांत चंदेवार (९९.९४ पर्सेंटाईल), यश भिसीकर (९९.९२ पर्सेंटाईल) यांनीदेखील यश मिळविले.
आता विद्यार्थ्यांचे सर्व लक्ष ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ‘जेईई-ॲडव्हान्स’कडे लागले असून, पात्र विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष केंद्रित केले आहे.