चौथे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:20 PM2019-09-16T23:20:52+5:302019-09-16T23:22:14+5:30
सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या वतीने चौथे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर २०१९ रोजी नागपुरात आयोजित करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या वतीने चौथे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर २०१९ रोजी नागपुरात आयोजित करण्यात येत आहे.
संस्थेच्या महाराष्ट्रभर आठ शाखा असून, रसिकांना साहित्याची मेजवानी मिळावी व मराठी भाषेविषयी आवड वृद्धिंगत व्हावी या हेतूने या संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, दर्जेदार गझल-मुशायरा, नामवंतांचे कविसंमेलन, सृजनप्रतिभा वाङ्मय पुरस्कार २०१८ चे वितरण, परिसंवाद, वºहाडी कॅटवाक व काव्यमय उखाणे स्पर्धा, समारोप, गुणवंतांचा सत्कार व तसेच इतरही बरेचसे साहित्यविषयक आकर्षण या निमित्त पाहावयास मिळेल. आतापर्यंतच्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, डॉ.गोपाल उपाध्ये व बबन सराडकर या मान्यवरांनी पद भूषविले आहे. साहित्य संघातर्फे चौथ्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत नियोजन करण्यात येत आहे. नियोजनाची जबाबदारी विजया मारोतकर, वर्षा किडे-कुळकर्णी, डॉ.भारत भुषण शास्त्री, विशाल देवतळे, राजेश कुबडे, नितीन मामीडवार, गणेश भाकरे, रवींद्र जवादे, मीना जवादे, प्रमोद पंत, खुशाल चिलविलवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.