नागपुरात उद्योग सुरू करण्यासाठी फ्रान्सच्या १२ कंपन्यांसोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:25 PM2018-11-03T12:25:30+5:302018-11-03T12:28:13+5:30

नागपूरसह विदर्भात पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे. मिहानसह बुटीबोरी पंचताराकित वसाहत, मेट्रो रेल्वे, लॉजिस्टिक पार्क, कार्गो धावपट्टीसह, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आर्थिक कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत आहे.

France's 12 companies contract for the industry | नागपुरात उद्योग सुरू करण्यासाठी फ्रान्सच्या १२ कंपन्यांसोबत करार

नागपुरात उद्योग सुरू करण्यासाठी फ्रान्सच्या १२ कंपन्यांसोबत करार

Next
ठळक मुद्देविदर्भात गुंतवणुकीचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह विदर्भात पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे. मिहानसह बुटीबोरी पंचताराकित वसाहत, मेट्रो रेल्वे, लॉजिस्टिक पार्क, कार्गो धावपट्टीसह, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आर्थिक कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत आहे. देशविदेशातील कंपन्यांना नागपूर गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्र्वोत्तम ठिकाण आहे. देशविदेशातील कंपन्यांनी नागपूरसह विदर्भात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
द इंडो-फें्रच चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या (आयएफआयआयसी) वतीने आणि फ्रान्स दूतावासाच्या सहकार्याने इंडो-फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन शुक्रवारी वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये करण्यात आले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतातील फ्रान्सचे राजदूत एच. ई. अ‍ॅलेक्झँडर झिगलर, आयएफसीसीआयचे अध्यक्ष गुलयुमी जिरार्ड रेडेट, कॉन्क्लेव्हचे मुख्य आयोजक प्रसन्ना मोहिले उपस्थित होते. या प्रसंगी फ्रान्सच्या १२ कंपन्यांनी देशातील कंपन्यांसोबत नागपुरात उद्योग सुरू करण्यासाठी करार केले. त्यामुळे रोजगार निर्मितीसह लघु उद्योजकांनाही फायदा होणार आहे.
नागपूर स्मार्ट सिटीमध्ये फ्रान्सच्या आठ कंपन्या भागीदार आहेत. ऊर्जेच्या बाबतीत विदर्भ सरप्लस आहे. शिवाय पॉवर टेरिफ अन्य लगतचे राज्य आणि उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत स्वस्त आहे. कंपन्यांच्या मदतीसाठी आपण २४ बाय ७ तत्पर असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
झिगलर म्हणाले, भारत आणि फ्रान्सचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. कॉन्क्लेव्हमुळे आर्थिक भागीदारी वाढणार आहे. फ्रान्सच्या ६०० कंपन्यांनी भारतात २०० दशलक्ष युरोची गुंतवणूक केली असून ४ लाख लोकांना रोजगार दिला आहे. गुंतवणुकीसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. पुढेही कंपन्या येतील, असा विश्वास आहे.
प्रास्तविकेत प्रसन्ना मोहिले म्हणाले, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दीड वर्षांपासून प्रयत्नरत होतो. चेंबरच्या अध्यक्षांनी होकार दिल्यानंतर यशस्वी आयोजन पार पडले. कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.
नागपुरात पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत आहे. सकाळी फ्रान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मिहानची पाहणी केली. कार्यक्रमासाठी १५० प्रतिनिधी आलेत, ही अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पॉवर सेंटर असून त्यांचा विकासात सहभाग आहे. पुढेही विकास सुरूच राहील.
त्यामुळे कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे येतील, असा विश्वास आहे. प्रारंभी स्मार्ट मोबिलिटी, लॉजिस्टिक, एरोस्पेस व डिफेन्स या विषयांवर समूह चर्चा झाली. त्यात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी भाग घेतला. आयएफसीसीआयचे सचिव पायल कनवर यांनी आभार मानले. या प्रसंगी फ्रान्स येथील कंपन्यांचे आणि फ्रान्सच्या भारतातील कंपन्यांचे १५० पेक्षा जास्त प्रतिनिधी आणि व्हीआयए, वेद आणि विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त विकास : गडकरी
पायाभूत सुविधांचा प्रचंड वेगाने विकास होत असल्यामुळे नागपूर देशविदेशातील कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम ठिकाण आहे. कंपन्यांनी यावे आणि उद्योग सुरू करावेत, अशी उत्तम स्थिती आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के जंगल विदर्भात आहे. शिवाय खनिज संपदा विपुल प्रमाणात आहे. मेट्रो रेल्वे, उड्डाण पूल, ड्राय पोर्ट, कार्गो धावपट्टी व हब, मिहान, बुटीबोरी पंचतारांकित एमआयडीसी, आयआयआयटी, आयआयएम, एम्स, बोर्इंग, रिलायन्स एरोस्पेस, ड्रायपोर्ट, जेएनपीटीशी थेट जोडणी, ४८ इंजिनिअरिंग कॉलेज, सिम्बॉयसिस, स्कील मॅनपॉवर, आयटी पार्र्क आदींसह पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त विकास या विदेशी कंपन्यांना गुुंतवणुकीसाठी जमेच्या बाजू आहेत. मी नागपूरचा खासदार असल्यामुळे विकासासाठी नागपूर जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळे फ्रान्सच्या कंपन्यांनी नागपुरात यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. गडकरी म्हणाले, फ्रान्सच्या कंपन्यांना येणाऱ्या समस्या त्यांच्या प्रतिनिधींनी शनिवार व रविवारी माझ्याकडे येऊन सोडवाव्यात. मुख्यमंत्रीही नागपूरचे आहेत. कंपन्यांच्या गुंतवणुकीची वाट आहे. मोहिले यांनी गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे.

करार करा, उद्योग सुरू करा
मुख्यमंत्री म्हणाले, कॉन्क्लेव्हमध्ये फ्रान्स १५० कंपन्याचे प्रतिनिधी हजर आहेत, ही नागपूरसाठी अभिमानाची बाब आहे. नागपूर विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. फ्रान्सच्या कंपन्यांनी करार करून उद्योग सुरू करावेत, अशा अद्ययावत सुविधा आहेत. विदेशी कंपन्यांना गुंतवणुकीची हीच वेळ आहे. नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्पे्रस हायवे थेट जेएनपीटीशी जोडणार आहे. या हायवेला डिफेन्स कॅरिडोर घोषित करण्याची संरक्षण मंत्रालयाकडे मागणी केली आहे. जीएसटीनंतर लॉजिस्टिकमध्ये गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत. वर्धा येथे ड्राय पोर्ट तयार होत आहे. पूर्वीच्या पाच हजार कि़मी. हायवेच्या तुलनेत पाच वर्षांत २० हजार कि़मी. हायवे तयार होत आहे. त्यापैकी सात हजार कि़मी.चे रस्ते तयार झाले आहेत. अ‍ॅग्रो प्रोसेसिंग, सप्लाय चेन आणि व्हॅल्यू चेनसाठी अपार संधी आहेत. विदर्भात डिफेन्स क्लस्टर स्थापन होणार आहे. नागपुरातील कार्गो धावपट्टी मुंबईच्या तुलनेत सर्वोत्तम राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Web Title: France's 12 companies contract for the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.