जावई-मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लावला १०० कोटींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:16 AM2021-07-10T10:16:47+5:302021-07-10T10:18:26+5:30

Nagpur News अगरबत्ती उद्याेगात गुंतवणूक करून दाेन महिन्यात दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लखनौ येथील रहिवासी जावई व मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लाेकांची १०० काेटीने फसवणूक केल्याचे प्रकरण समाेर आले आहे.

Fraud of 100 crores all over the country by two relatives | जावई-मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लावला १०० कोटींचा चुना

जावई-मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लावला १०० कोटींचा चुना

Next
ठळक मुद्देलाॅकडाऊन लागताच झाले गायब अगरबत्ती व्यवसायाच्या नावाने देशभरात फसवणूक

जगदीश जोशी

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : अगरबत्ती उद्याेगात गुंतवणूक करून दाेन महिन्यात दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लखनौ येथील रहिवासी जावई व मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लाेकांची १०० काेटीने फसवणूक केल्याचे प्रकरण समाेर आले आहे. पाॅश हाॅटेल्समध्ये सेमिनार आयाेजित करून या जाेडीने लाेकांना चुना लावला.

या फसवणुकीचा सूत्रधार गिरीशचंद्र गुप्ता व त्याचा मेव्हणा राजेशकुमार गुप्ता हाेय. दाेघांनी जीबीएस कंपनी सुरू करून अनिल सिबे संचालक, अजगर अलीला कंपनीचा प्रमाेटर व नागपूरचे राज शर्मा व प्रेम पुरके यांना एजंट म्हणून नियुक्त केले. ठगांनी शिताफीने अली, शर्मा व पुरके यांना समाेर केले. त्यांनी २०१९ मध्ये नागपूरच्या गुंतवणूकदारांशी संपर्क केला. त्यांना चर्चेसाठी मुंबईच्या पाॅश हाॅटेलमध्ये बाेलाविले. विमानाची तिकिटेही करून दिली. त्यानुसार वर्धेच्या सुनील जायसवाल यांच्यासह चार लाेक २६ मार्च राेजी मुंबईला गेले. अलीने जावई व मेव्हण्याच्या कंपनीला १० वर्षापासून ओळखत असल्याचे सांगितले. त्यांचा अगरबत्ती निर्मितीचा माेठा कारभार असून १०५०० रुपये गुंतवणूक केल्यास २०००० चा माल देण्यात येणार असल्याचे सांगितले. विक्री करण्याची इच्छा नसल्यास स्वत: कंपनी ते विकून १५००० रुपये परत करेल, असे आमिष दाखविले.

मुंबईमध्ये अलीने जायसवाल व साेबत्यांना नागपूरच्या एका महिलेशी ओळख करून दिली. त्या महिलेस ७० हजार रुपयाचा चेक देण्यात आला. कंपनीने दाेन महिन्यात दीडपट दिल्याचे त्या महिलेने सांगितले. जायसवालसह इतर १०-१२ लाेकांनी कंपनीमध्ये प्रत्येकी एक ते दाेन लाखांची गुंतवणूक केली. त्यांना दाेन महिन्यातच दीडपट रक्कम परत करण्यात आली. पुन्हा पैसा देण्याऐवजी गुंतवणूक करण्याचे आवाहन जावई-मेव्हण्याने केले. चार महिने नफा दिल्यानंतर खरा खेळ सुरू झाला. मग पैसा परत करण्यास टाळाटाळ सुरू झाली. दरम्यान २२ मार्च २०२० राेजी जनता कर्फ्यू व २४ मार्चला लाॅकडाऊन लावण्यात आला. लाॅकडाऊन लागताच गुप्ता जाेडीने कंपनीची वेबसाईट बंद करून टाकली आणि दाेघेही पसार झाले. गिरीश गुप्ताने स्वत:च्या मृत्यूचा खाेटा व्हिडीओ बनविला. जाेडीला शाेधण्यासाठी पीडित लखनौपर्यंत गेले. तेथे त्याचे चार बंगले असल्याची बाब समजली. गुंतवणूकदार तेथे पाेहचताच दाेघांनी पळ काढला. या जाेडीने अलाहाबादमधल्या वकिलांचे ६.५० काेटी लंपास केले. याशिवाय लखनौ, कानपूर, मुंबईसह अनेक शहरात फसवणुकीचे सत्र चालवून अनेकांना लुटले.

नागपुरातून लुटले २० काेटी

आर्थिक गुन्हे शाखेने ६ जुलै राेजी ३.३३ काेटीच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र नागपूर व आसपासच्या शहरातून २० काेटीहून अधिकची फसवणूक केल्याचे लक्षात येत आहे. त्यातील २५० लाेकांची नावे समाेर आली असून फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पीडितांची स्थिती अतिशय वाईट

ठग जाेडीच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. काहींनी तर त्यांचे नातेवाईक व मित्रांनाही गुंतवणूक करायला भाग पाडले. आता ते मित्र व नातेवाईक पैशासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्यासारखी स्थिती आल्याचे सांगितले आहे. पीडितांनी पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यावर पाेलीस कारवाईसाठी तत्पर झाले.

Web Title: Fraud of 100 crores all over the country by two relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.