बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणूक
By admin | Published: February 6, 2016 03:07 AM2016-02-06T03:07:52+5:302016-02-06T03:07:52+5:30
जमीन मालकाचे बनावट मृत्युपत्र तयार करून त्याच्या प्लॉटची परस्पर विक्री करणाऱ्या एका टोळीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
टोळीविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : जमीन मालकाचे बनावट मृत्युपत्र तयार करून त्याच्या प्लॉटची परस्पर विक्री करणाऱ्या एका टोळीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लीलाधर रामराव यादव (रा. वसंतनगर), रितेश अविनाश लोणारे (रा. जयभीमनगर, रामेश्वरी), राजेंद्र श्रीवास्तव, रितेश सुनील वारेकर (रा. जोगीनगर, रामेश्वरी), विनोद वामन उन्हाळे (रा. रामेश्वरी) आणि त्यांचे दोन साथीदार या टोळीत सहभागी आहेत.
हुडकेश्वर हद्यीत मौजा बेसा परिसरात न्यू वसुंधरा हाऊसिंग सोसायटी आहे. तेथील पहन ३८, खसरा नं. ५६ येथील प्लॉट नं. ९० हा २ हजार चौरस फुटाचा प्लॉट कृष्ण सुब्रमण्यम यांच्या मालकीचा आहे.
आरोपींनी १७ नोव्हेंबर २०१४ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत बनावट मुद्रांकावर रजिस्ट्री तयार करून घेतली. त्यात त्यांचा वारस अजय मूर्ती याच्या ऐवजी बाला कृष्ण सुब्रमण्यम नावाच्या व्यक्तीला उभे केले आणि संबंधित सोसायटीकडून बनावट मृत्युपत्र तयार करून २० लाख, ४० हजारांच्या या भूखंडाची विक्री केली. भूखंड मालकासोबतच शासनाचीही फसवणूक करण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रदीप भाऊराव मेंढे (वय ३९, रा. मिसाळ लेआऊट) यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)